'अॅमेझॉन'चे संस्थापक Jeff Bezos यांचा घटस्फोट; 25 वर्षांचा संसार मोडीत
अॅमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीचा संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस यांनी पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे.
अॅमेझॉन (Amazon ) या ई-कॉमर्स कंपनीचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे. 25 वर्षे संसार केल्यानंतर दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. याची माहिती खुद्द बेझोस यांनी ट्विट करुन दिली.
"आमचे कुटुंबिय आणि मित्रमंडळींप्रमाणे आमच्या आयुष्यात होणाऱ्या बदलांबद्दल लोकांनाही माहित असावे, असे मला वाटते. अनेक वर्षे एकत्र राहिल्यानंतर आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही मित्र म्हणून कायम सोबत असू," असे ट्विट बेझोस यांनी केले आहे. त्याचबरोबर अनेक प्रोजेक्ट्स आणि संयुक्त उपक्रमांमध्ये एकत्र राहण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. जेफ-मॅकेन्झी यांना चार मुले आहेत.
54 वर्षांचे जेफ बेझॉस हे 112 बिलियन डॉलर म्हणजेच 7 लाख 90 हजार 552 कोटींचे मालक आहेत. 2018 मधील ते सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले. तर मॅकेन्झी बेझॉस या 48 वर्षांच्या असून त्या प्रसिद्ध लेखिका आहेत. दरम्यान, या आठवड्यात, अॅमेझॉन मायक्रोसॉफ्टला मागे टाकत व्हाट स्ट्रीटमध्ये सर्वात मूल्यवान कंपनी बनली.