Railway Online Ticket Booking Rules: दुसऱ्यांचं तिकीट काढला तर थेट तुरुंगात जाल, दंडही भरावा लागेल; Indian Railway चा नवा नियम माहित आहे का?
दुसऱ्यांचे Ticket काढणाऱ्यांना थेट तुरुंगात टाकण्याचा नियमच रेल्वेने बनवला आहे.
Railway Online Ticket Booking Rules: रेल्वेने आजपर्यंत त्यांच्या सेवांमध्ये अनेक बदल करत प्रवाशांना कमी मोबदल्यात चांगल्या सोयी देण्याला प्राधान्य दिलं आहे. प्रवाशांचं हित केंद्रस्थानी ठेवत रेल्वेनं (Indian Railways)काही नवे नियम बनवले आहेत. ज्यात तिकीट आरक्षण प्रक्रियेमध्ये(Railway Online Ticket Booking) सुसूत्रता आणण्यासाठी काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यात लक्ष देण्याची बाब म्हणजे या नवा नियमानुसार जर तुम्ही तुमच्या अकाऊंटमरून दुसऱ्याचे तिकीट बुक केले तर, तिकीट काढणाऱ्यांला थेट तुरुंगात जावं लागणार आहे. रेल्वे कायद्यातील अनुच्छेद 143 नुसार फक्त अधिकृत परवानगी असणाऱ्या एजंटनाच त्रयस्त व्यक्तींसाठी रेल्वे तिकीटांचं आरक्षण करता येणार आहे. (हेही वाचा:Konkan Railway Monsoon Time Table 2024: कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक! 10 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान मान्सून स्पेशल वेळापत्रकानुसार धावणार ट्रेन)
आतापर्यंत अनेकदा IRCTC Account च्या माध्यमातून लोक मित्रमंडळी किंवा ओळखीतील एखाद्या व्यक्तीला तिकीट काढून देत होते. ही मदत महागात पडू शकते. दुसऱ्यांसाठी रेल्वे तिकीट काढणे हे कृत्य गुन्ह्यास पात्र असून, असं करणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अधिकृत परवानगी असणाऱ्या एजंटनाच इतर व्यक्तींसाठी रेल्वे तिकीटांचं आरक्षण करता येणार आहे. या नियामांचं उल्लंघन करणाऱ्याला 3 वर्षांचा कारावास आणि 10,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
रेल्वेच्या नव्या नियमानुसार कोणीही व्यक्ती फक्त त्यांचं रक्ताचं नातं असणाऱ्यांसाठीच तिकीट बुक करु शकतो. म्हणजेच तिकीट बुक करणारा आणि प्रवास करणार्या व्यक्तींचं आडनाव एकसारखं असणं गरजेचं आहे. त्यामुळे मित्रमंडळी किंवा ओळखीच्या एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही तिकीट बुक करू शकत नाही. असे केल्यास ते महागात पडू शकते. तिकीट आरक्षणामध्ये सूसुत्रता आणण्यासाठी आणि कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी हे नियम आखण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.