Lanka Premier League: इरफान पठाण आणि शाहिद आफ्रिदीच्या हाती निराशा, 5 पैकी 3 आयकॉन क्रिकेटपटू चाळीशी पार; पहा संपूर्ण यादी

लंका प्रीमियर लीग 2021 मध्ये खेळण्यासाठी माजी भारतीय क्रिकटपटू इरफान पठाण आणि पाकिस्तानी दिग्गज शाहिद आफ्रिदीने देखील इच्छा वर्तवली होती. पण त्यांची निवड झाली नाही.

शाहिद आफ्रिदी (Photo Credit: Instagram)

वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज क्रिस गेल (Chris Gayle) आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) यांचा लंका प्रीमियर लीगच्या (Lanka Premier League) ‘प्लेअर्स ड्राफ्ट’मध्ये निवड झालेल्या स्टार खेळाडूंमध्ये समावेश आहे. मंगळवारी 300 परदेशी आणि 300 श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंसह एकूण 600 खेळाडू ‘प्लेअर्स ड्राफ्ट’चा भाग होते, जे ऑनलाइन आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाच फ्रँचायझी संघ आणि श्रीलंका (Sri Lanka) क्रिकेटचे अधिकारी उपस्थित होते. कोलंबो स्टार्स, डंबुला जायंट्स, गॅले ग्लॅडिएटर्स, जाफना किंग्स आणि कॅंडी वॉरियर्स या पाच फ्रँचायझींनी त्यांचे संघ निवडले. लंका प्रीमियर लीग यंदा 5 ते 23 डिसेंबर दरम्यान आयोजित केली आहे. यामध्ये प्रत्येकी संघासाठी प्रत्येकी 20 खेळाडूंची निवड करण्यात आली असून यामध्ये एक विदेशी आणि एक देशी आयकॉन खेळाडूचा समावेश आहे.

इमरान ताहीर, मोहम्मद हाफीज, क्रिस गेल, फाफ डु प्लेसिस आणि रोव्हमन पॉवेल हे पाच विदेशी आयकॉन खेळाडू आहेत. उल्लेखनीय म्हणजे यापैकी तीन- ताहीर, गेल आणि हाफिजने, वयाची चाळीशी ओलांडली आहे. याशिवाय दासुन शनाका, इसुरु उदाना, दुष्मंथ चमीरा, थिसारा परेरा आणि चरिथ असलंका हे देशी आयकॉन खेळाडू आहेत. दरम्यान कोलंबो स्टार्स, डंबुला जायंट्स, गॅले ग्लॅडिएटर्स, जाफना किंग्स आणि कॅंडी वॉरियर्स - या पाच फ्रँचायझींने त्यांच्या संघट अनेक स्फोटक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टार खेळाडूंचा समावेश केला आहे. लक्षात घ्यायचे की प्रत्येकी संघात 14 स्थानीय व सहा विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. विदेशी खेळाडूंना 4 विभागातुन निवडण्यात आले आहेत. 'ओव्हरसीज आयकॉन प्लेयर', 'ओव्हरसीज डायमंड प्लेअर', 'ओव्हरसीज गोल्ड प्लेअर', आणि 'ओव्हरसीज क्लासिक प्लेयर' अशा विभागांचा यामध्ये समावेश आहे. लंका प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम 5 डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान होणार आहे.

उल्लखनीय आहे की लंका प्रीमियर लीग 2021 मध्ये खेळण्यासाठी माजी भारतीय क्रिकटपटू इरफान पठाण आणि पाकिस्तानी दिग्गज शाहिद आफ्रिदीने देखील इच्छा वर्तवली होती. पण त्यांची निवड झाली नाही. लंका प्रीमियर लीगचा पहिला हंगाम जाफना स्टॅलियन्स संघाने जिंकला होता. अंतिम फेरीत जाफनाने गॅले ग्लॅडिएटर्स संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.