Mumbai: आता 400 CNG बसेसचा वापर बंद; आगीच्या घटनांनतर BEST चा मोठा निर्णय, वेळापत्रकात होणार बदल
आगीच्या घटना लक्षात घेता, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी OEM (मूळ उत्पादक) आणि ऑपरेटर हे बसेसमध्ये आवश्यक सुधारात्मक उपाययोजना करेपर्यंत या बस रस्त्यावर धावणार नाहीत, असे बेस्टने सांगितले आहे.
मुंबईची नागरी वाहतूक संस्था बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्टने (BEST) बुधवारी सांगितले की, M/S Mateshwari Ltd द्वारे चालवल्या जाणार्या टाटा सीएनजीच्या (TATA CNG) 400 भाडेतत्त्वावरील बसेस या आता रस्त्यावर धावणार नाहीत. एका महिन्यात तब्बल तीन वेळा या बसेसला आग लागण्याच्या घटना समोर आल्यानंतर बेस्टने या 400 बसेस प्रवाशांच्या सेवेतून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आगीच्या घटना लक्षात घेता, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी OEM (मूळ उत्पादक) आणि ऑपरेटर हे बसेसमध्ये आवश्यक सुधारात्मक उपाययोजना करेपर्यंत या बस रस्त्यावर धावणार नाहीत, असे बेस्टने सांगितले आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी एका निवेदनात याबाबत माहिती दिली. बेस्टने सांगितले की, या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय होत असली तरी बेस्टसाठी सार्वजनिक सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. त्याबाबत ते तडजोड करू शकत नाही. यामुळे बेस्ट बसेसच्या वेळापत्रकात काही बदल होऊ शकतात.