स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उपक्रम राबविण्यात देशात महाराष्ट्र पहिल्या स्थानी; पुणे जिल्ह्याची सर्वोत्तम कामगिरी
‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ निमित्ताने १२ मार्च २०२१ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत देशभरात विविध उपक्रम आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत आयोजित उपक्रमांची संख्या व त्याची माहिती संकेतस्थळावर भरण्यात संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला असून राज्यात पुणे जिल्ह्याने अग्रस्थान मिळविले आहे. देशात झालेल्या उपक्रमांपैकी तब्बल ७५ टक्के उपक्रम एकट्या महाराष्ट्रात राबवण्यात आले आहेत.
‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ निमित्ताने १२ मार्च २०२१ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत देशभरात विविध उपक्रम आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच आयोजित केलेल्या उपक्रमांची माहिती खास अमृतमहोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या https://indiaat75.nic.in व https://amritmahotsav.nic.in या संकेतस्थळावर भरणे अपेक्षित होते. त्यामध्ये संपूर्ण भारतातून ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा व राज्य या चारही स्तरावर सर्वात जास्त ४ लाख ४ हजार २८२ इतक्या उपक्रमांचे आयोजन व संकेतस्थळावर माहिती भरून महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे.