दादर रेल्वे स्थानकावर 'ह्युमन इंडिकेटर' बनून प्रवाशांना मदत करणारे Narendra Patil कोण?
दादर स्थानकावर दररोज दोन तास प्रवाशांना योग्य फलाटाची दिशा दाखवणारे नरेंद्र पाटील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. त्यांना 'ह्युमन इंडिकेटर' म्हणून ओळखले जात असून, त्यांच्या निःस्वार्थ सेवेचे नेटिझन्सकडून कौतुक होत आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वे मधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. यामध्येही दादर हे खूपच गजबजलेलं स्थानक आहे. दादर स्थानकामधून (Dadar Station) ट्रेन बदलणार्यांची संख्याही मोठी आहे. योग्य फलाट शोधणे अनेकांसाठी गोंधळाचे ठरते. गेल्या अनेक वर्षांपासून एक स्वयंसेवक कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रवाशांना योग्य दिशा दाखवण्याचे काम करत आहे. नरेंद्र पाटील (Narendra Patil) असे या व्यक्तीचे नाव असून, 'ह्युमन इंडिकेटर' (Human Indicator) या नावाने ते ओळखले जातात. सेंट्रल लाईनला जोडणाऱ्या दादर वेस्टर्न लाईन पुलावर ते दररोज दोन तास प्रवाशांना रस्ता दाखवण्याचं काम करतात.
सोशल मीडियावर 'ह्युमन इंडिकेटर' नरेंद्र पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल
नरेंद्र पाटील यांच्या या निःस्वार्थ सेवेची दखल एका इन्स्टाग्राम व्हिडिओमुळे मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहे. @trainsofindia या हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओत ते प्रवाशांच्या प्रश्नांना संयमाने उत्तर देताना आणि हसतमुखाने योग्य फलाटाकडे मार्गदर्शन करताना दिसतात.
नरेंद्र पाटील यांची दररोज दोन तास सेवा
या पोस्टनुसार, पाटील दर आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत एकाच ठिकाणी उभे राहून प्रवाशांना मुंबईतील सर्वात वर्दळीच्या इंटरचेंज स्थानकांपैकी एका स्थानकावर मार्ग दाखवतात. विरार जलद गाडी कोणत्या फलाटावर येईल, बोरिवली स्लो गाडीसाठी कुठे जायचे, कल्याण किंवा पनवेलला कसे जायचे, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे ते तितक्याच उत्साहाने देतात. Mumbai Palghar Local Viral Video: धावत्या गाडीतून खाडीत पडलेल्या प्रवाशाचे रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण .
ओळखीचा चेहरा
अनेक नियमित प्रवासी पाटील यांना ओळखतात आणि कामावर जाताना त्यांना स्मितहास्य किंवा हात हलवून अभिवादन करतात. सकाळची गर्दी ओसरल्यानंतर पाटील स्वतःच्या कामाच्या ठिकाणी रवाना होतात. यामध्ये त्यांना कोणतीही प्रसिद्धी किंवा मोबदला याची अपेक्षा नाही. या व्हायरल व्हिडिओला सोशल मीडिया यूजर्सकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी पाटील यांना मुंबईच्या सामुदायिक भावनेचे उदाहरण म्हटले आहे. "अखेर कोणीतरी त्यांच्याबद्दल बोलले," आणि "भारताच्या अशा शांत नायकांना सलाम" अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या आहेत.