छत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल
छत्तीसगडमधील निवडणूकीदरम्यान राहुल गांधींची भेट पंतप्रधान मोदींसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीशी भेट झाली.
छत्तीसगडमधील पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूकीचा प्रचार थांबवण्यात आला आहे. पक्षाच्या विजयासाठी छत्तीसगडमध्ये राहुल गांधी दिवस रात्र एक करुन प्रचार करत होते. यामध्ये रोड शो, रॅली यांचाही समावेश होता. त्याचदरम्यान राहुल गांधींची भेट पंतप्रधान मोदींसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीशी भेट झाली. या व्यक्तीचे नाव आहे अभिनंदन पाठक.
अभिनंदन पाठकसोबत फोटो काढून राहुल गांधींनी इंस्टाग्रामवर शेअर केला. हा फोटो शेअर करत राहुल गांधींनी लिहिले की, "पाहा छत्तीसगडमध्ये काँग्रेस पार्टीचा प्रचार करताना मला कोण भेटलं."
कोण आहे अभिनंदन पाठक ?
पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे दिसणारे अभिनंदन पाठक हे भारतीय जनता पार्टीचे नाही तर काँग्रेस पार्टीचे आहेत. छत्तीसगड विधानसभा निवडणूकीत ते काँग्रेस पक्षाचा प्रचार करत होते. अभिनंदन पाठक हे फक्त नरेंद्र मोदींसारखे दिसत नाहीत तर त्यांचा चालण्या-बोलण्याचा अंदाजही मोदींसारखा आहे.
छत्तीसगडच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूका 12 नोव्हेंबरला होत आहेत. तर दुसऱ्या टप्प्यासाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राज्यातील नक्षल प्रभावित बस्तर क्षेत्रातील सात जिल्ह्यात कांकेर, कोंडागांव, बस्तर, नारायणपूर, बिजापूर, दंतेवाडा, सुकमा आणि राजनांदगांवच्या 18 विधानसभा क्षेत्रात 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.