पनीर चिलीमध्ये प्लास्टिक सापडल्यानंतर 'झोमॅटो'ने व्यक्त केली दिलगिरी; सबंधित हॉटेलचे नाव यादीतून वगळले
औरंगाबाद येथील एका ग्राहकाने शुक्रवारी झोमॅटोवरुन ऑर्डर केलेल्या पनीर चिलीमध्ये प्लास्टिक आढळून आले.
औरंगाबाद (Aurangabad) येथील एका ग्राहकाने शुक्रवारी झोमॅटोवरुन (Zomato) ऑर्डर केलेल्या पनीर चिलीमध्ये प्लास्टिक आढळून आले. या धक्कादायक प्रकारानंतर झोमॅटोने दिलगिरी व्यक्त केली असून संबंधित रेस्टॉरन्टचे नाव आपल्या यादीतून काढून टाकले आहे. या घटनेमुळे ग्राहकाची झालेली गैरसोय, त्रास याबद्दल झोमॅटोने दिलगिरी व्यक्त केली आहे.
शुक्रवारी सचिन जामधरे (Sachin Jamdhare) नावाच्या व्यक्तीने झोमॅटोवरुन जेवण ऑर्डर केले होते. त्यापैकी पनीर चिली या पदार्थात त्यांना प्लास्टिक असल्याचे आढळून आले. या घटनेनंतर सचिन यांंनी हॉटेल मालकाकडे तक्रार केली असता उडवाउडवीची उत्तरे देत झॉमेटो डिलिव्हरी बॉयने पार्सलमध्ये बदल केला असेल, असे सांगण्यात आले. त्यानंतर चिडलेल्या सचिन यांनी हॉटेल मालक आणि झोमॅटोविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. याबद्दल बोलताना सचिन यांनी सांगितले की, "मी खरोखरच माझ्या मुलांच्या आरोग्याबद्दल चिंताग्रस्त होतो. त्यामुळे मी पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. तसंच मला या घटनेबद्दल नागरिकांमध्ये जागृकता निर्माण करायची होती. हे लोक थोड्याथोडक्या पैशांसाठी आपल्या आरोग्यासोबत खेळतात." ऑनलाईन ऑर्डर केलेल्या जेवणात सापडले प्लास्टिक; झोमॅटो डिलिव्हरी बॉयने पार्सलमध्ये बदल केल्याचा हॉटेल मालकाचा आरोप
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेत पदार्थाचे काही नमुने एफडीएकडे तपासणीसाठी पाठवले आहेत.