Sanay Raut यांना भेटण्यासाठी Uddhav Thackeray यांनी मागितली परवानगी; आर्थर रोड तुरुंग प्रशासनाने दिला नकार
उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या शिवसेनेच्या नेत्याने तुरुंग प्रशासनाला फोन करून उद्धव ठाकरेंना संजय राऊत यांना फक्त 15 मिनिटे भेटायचे आहे, असे सांगितले होते, मात्र तुरुंग प्रशासनाने नकार दिला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanay Raut) यांना आर्थर रोड तुरुंग (Arthur Road Jail) भेटण्याची परवानगी प्रशासनाने नाकारली आहे. ठाकरे यांनी राऊत यांना जेलरच्या खोलीत भेटण्यासाठी आर्थर रोड तुरुंग प्राधिकरणाकडे परवानगी मागितली होती, परंतु तुरुंग प्रशासनाने यासाठी नकार दिला आहे, असे एएनआयने वृत्त दिले आहे.
मुंबईतील गोरेगाव उपनगरातील पत्रा चाळच्या पुनर्विकासात कथित आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) संजय राऊत यांना 1 ऑगस्ट रोजी अटक केली होती. सुरुवातीला ईडीच्या कोठडीत राहिल्यानंतर 8 ऑगस्ट रोजी शिवसेना नेत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. 22 ऑगस्ट रोजी विशेष पीएमएलए न्यायालयाने राऊत यांची कोठडी 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली होती, जी आता 19 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
ईडीचा तपास हा पत्रा चाळच्या पुनर्विकासात कथित आर्थिक अनियमितता आणि राऊत यांच्या पत्नी आणि सहकारी यांच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांशी संबंधित आहे. उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या परवानगीबाबत एएनआयने तुरुंग प्राधिकरणाच्या हवाल्याने म्हटले आहे की, ‘जाळीच्या त्या बाजूला सामान्य कैदी ज्या प्रकारे भेटतात त्याच प्रकारे संजय राऊत यांना भेटावे लागेल आणि त्यासाठी देखील न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे.’ (हेही वाचा: शिवसेनेकडून सामनामधून काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे समर्थन, जाणून घ्या नेमकं काय लिहिले आहे?
उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या शिवसेनेच्या नेत्याने तुरुंग प्रशासनाला फोन करून उद्धव ठाकरेंना संजय राऊत यांना फक्त 15 मिनिटे भेटायचे आहे, असे सांगितले होते, मात्र तुरुंग प्रशासनाने नकार दिला. राऊत यांना भेटण्यासाठी ठाकरे यांना न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल आणि जेलरच्या खोलीत ही भेट अजिबात होऊ शकत नाही, असेही तुरुंग प्राधिकरणाने म्हटले आहे. दरम्यान, या वर्षी एप्रिलमध्ये, ईडीने 11.15 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली होती, ज्यात संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्याकडे असलेला दादर येथील फ्लॅट आणि स्वप्ना पाटकर यांच्यासोबत अलिबागजवळील किहीम येथील मालमत्तेचा समावेश होता.