Uddhav Thackeray Dasara Melava Live Streaming: शिवाजी पार्क येथे पार पडणार शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा; पहा उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण (Video)

सुरुवातीला खासदार अरविंद सावंत, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह काही नेते भाषण करणार आहेत.

Uddhav Thackeray | (File Image)

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे दोन नेते दोन वेगवेगळे दसरा मेळावे (Dussehra Rally) घेत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दरवर्षीप्रमाणे दादरच्या शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला संबोधित करतील, तर शिवसेनेवर दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाचा मेळावा वांद्रे कुर्ला संकुलात पार पडणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये अनेक सभा घेऊन आपल्या पक्षाचा प्रचार केला होता. या मैदानावर शिवसेनेने अनेक मोठे बदल पाहिले, अनेक मोठे निर्णय याच ठिकाणी जाहीर करण्यात आले. त्यामुळे शिवसैनिकांसाठी भावनिकदृष्ट्या या मैदानाचे मोठे महत्व आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाला या मेळाव्यासाठी मुंबईतून 50,000 लोक येतील अशी अपेक्षा आहे. शिवसेनेने दसरा मेळावा यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्या 12 विभागांच्या प्रमुखांवर सोपवली आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, नाशिक, औरंगाबाद आदी जिल्ह्यातील शिवसैनिकही या मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे गटाचा हा दसरा मेळावा आज संध्याकाळी साडेसह वाजता सुरु होणार आहे. सुरुवातीला खासदार अरविंद सावंत, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह काही नेते भाषण करणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे भाषण होईल. या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.

हे भाषण तुम्ही TV9 Marathi ABP Majha वर थेट पाहू शकाल.

TV9 Marathi -

ABP Majha-

दरम्यान, शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा 5 दशकांपासून होत असला तरी, यंदा जनतेसह राजकीय विश्लेषकांचे लक्षही या मेळाव्याकडे आहे. काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी सेनेचे 40 आमदार आपल्या बाजूने वळवले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या मदतीने महाविकास आघाडी सरकार पाडले व आता ते शिवसेना पक्ष व पक्षाच्या चिन्हावर हक्क सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे कोणकोणत्या मुद्द्यांवर भाष्य करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.