बीडीडी चाळीत बनावट रहिवाशांचा सुळसुळाट, बीडीडी चाळींच्या पुर्नवसनात आढळली 3 हजार बनावट प्रकरणे

बीडीडी चाळीत तीन हजार बनावट रहिवाशांची प्रकरणे आढळून आली आहेत.

BDD Chawl (Photo Credits: File)

मुंबईतील फार जुनी आणि महत्त्वाची म्हणून ओळखली जाणारी बीडीडी चाळींच्या(BDD Chawl) पुर्नवसनाचा विचार ऐरणीवर आला असून, अलीकडेच ह्या चाळींची मोजमाप करत असता प्रशासनाला बीडीडी चाळीतील रहिवाशांची तीन हजार बनावट प्रकरणे आढळून आली आहेत. ही प्रकरणे पुढील चौकशीसाठी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सुपूर्त करण्यात आली आहेत. वरळीतील ना.म.जोशी मार्ग आणि नायगाव या दक्षिण तसेच मध्य मुंबईसारख्या परिसरात 500 चौ.फूटाचे घर मिळण्याच्या आशेने बीडीडी चाळीत बनावट रहिवाशांनी शिरकाव केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांमुळे या रहिवाशांची नोंद होऊ शकली नाही असे सांगण्यात येत आहे. या बनावट रहिवाशांना या या प्रकल्पात घर मिळणार असले तरी या प्रकरणाची चौकशी करुन दोषी अधिका-यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.

बीडीडी चाळींमध्ये रहिवासी, पोलीस, संस्था आणि अनिवासी गाळे असे एकूण १५ हजार ५९३ सदनिकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. यामधील एकूण तीन हजार रहिवासी हे मूळ नसल्याचे आढळून आले. या चाळी भाडय़ाने राहण्यासाठी देण्यात आलेल्या आहेत. भाडेही अत्यल्प आहे. अशावेळी भाडेकरू ही घरे विकू शकत नाही. परंतु तरीही ही घरे अनेक भाडेकरूंनी हस्तांतरित केली. हे बेकायदा असले तरी नव्या आलेल्या भाडेकरूच्या नावे सार्वजनिक बांधकाम विभागाने भाडेपावती जारी केली आहे.

धारावी झोपडपट्टीचा लवकरच होणार पुनर्विकास, धारावीकरांना मोठा दिलासा मिळणार 

ह्या संबंधित मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत 28 जून 2017 पर्यंतच्या सर्व भाडेकरूंना अधिकृत ठरविण्यात आले आहे. मात्र बनावट भाडेकरूंना मदत करणा-या सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ह्या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत.