Nisarga Cyclone Update: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला तातडीची मदत केली जाहीर

त्याचबरोबर तातडीची मदत म्हणून रत्नागिरीला 75 कोटी,सिंधुदुर्गला 25 कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात 3 जूनला आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे (Nisarga Cyclone) रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg), ठाणे (Thane), पालघर (Palghar), रायगड जिल्हयांना फटका बसला. या भागातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. या चक्रीवादळामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. यांना सावरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्ह्याच्या पाहणीदौरा करून 100 कोटींची मदत जाहीर केली. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी व्हिडिओ कॉन्सफरन्सद्वारे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्याचबरोबर तातडीची मदत म्हणून रत्नागिरीला 75 कोटी,सिंधुदुर्गला 25 कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

याशिवाय ठाणे, पालघर जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेऊन या मदत जाहीर करतील असेही त्यांनी सांगितले आहे. ठाणे, पालघर जिल्ह्याला देखील या निसर्ग चक्रीवादळाचा बराच फटका बसला आहे. Cyclone Nisarga चा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्याला 100 कोटींंची तातडीची मदत जाहीर, पंचनाम्यानंतर भरपाईचं स्वरूप ठरणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

हे संकट किती गंभीर आहे यावर मी काही बोलणार नाही कारण कोकणवासियांनी ते जवळून अनुभवले आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सरकार तुमच्या सोबत असूनच लवकर मी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देईल असे आश्वासनही दिले.

रायगड सोबतच रत्नागिरी, पुणे या भागतही काही ठिकाणी घरांचे मोठे नुकसान झालं आहे. लहान मोठी झाडं उन्मळून पडली आहेत. त्याच्या साफसफाईची काम सुरू करण्यात आली आहे. जनसामान्यांचं आयुष्य पूर्ववत होण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील असा विश्वास त्यांनी जनतेला दिले आहे.