ST Employees Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात; ग्रामीण भागाला सर्वाधिक फटका, शहरांमध्ये कशी परिस्थीती?
एसटी कर्मचारी संघटनेने राज्यभरात बेमुदत संप पुकारला आहे. प्रलंबित मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा असा इशारा देत एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.
ST Employees Strike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन देणे, महागाई भत्ता-घरभाडे भत्ता देणे, खाजगीकरण, सुधारीत जाचक कार्यपद्धती रद्द करणे अशा विविध मागण्यासाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. कालच एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक डेपोट एसटी बसेस उभ्या राहिल्या असल्याचे दिसत आहे. पहाटेपासूनच या संपाला एसटी कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. अकोला(Akola), अमरावती (Amravati), अहमदनगर(Ahmednagar) आणि धाराशिव(Dharashiv) जिल्ह्यातून एसटी बसेस डेपोमध्ये उभ्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. पहाटेपासूनच एसटी स्थानकावर प्रवशांची गर्दी दिसून येत आहे. (हेही वाचा: Ganpati Special ST: चाकरमान्यांसाठी लालपरी सज्ज; मुंबईहून कोकणात जाण्यासाठी 75 टक्के जादा बसेस बुक)
अकोला मध्यवर्ती बसस्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. परिणामी नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक एसटी कर्मचारी सरकारविरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत. काही ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी डेपोबाहेरच आंदोलन सुरू केल आहे. त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराषट्रात आपल्या प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
विशेष बाब म्हणजे यापूर्वी 2021 मध्ये महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी दीर्घकालीन संप पुकारला होता. तेव्हा तब्बल 54 दिवस एसटी बस थांबली होती. आता ऐन गणेशोत्सव काळात लालपरीला ब्रेक लागणार असल्याने गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसह सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव(Ganeshotsav 2024) राज्यभरात साजरा केला जाणारा आहे. त्याआधीच एसटी कर्मचारी संघटनेने आंदोलन पुकारल्याने राज्यभरात नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. एसटीचे तिकीट बुक करून अनेकांनी गणेशोत्सवात गावी जाण्याचे नियोजन आखले आहे. जर, संप जास्त दिवस सुरू राहिला तर नागरिकाना गावी जाता येणार नाही. एस टी कामगारांची आर्थिक पिळवणूक थांबवावी यासाठी कामगारांनी राज्यभरात निदर्शने करण्यास सुरूवात केली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2024 09:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

