राष्ट्रवादीचे घड्याळ सोडणा-यांची वेळ चुकली; शरद पवारांची एकाकी झुंज यशस्वी ठरली
किंबहुना या सभेने मते जिंकली असं म्हणायला हरकत नाही. त्याचा परिणाम आजच्या मतमोजणीवर पाहायला मिळतोय. वयाच्या 78 व्या वर्षी भर पावसात भाषण करणारे शरद पवारांनी प्रचाराच्या टप्प्यात सिक्सर मारत लोकांची मने जिंकली.
यंदाची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 ही सर्वच पक्षांसाठी खूपच धक्कादायक होती. पक्षांतर्गत झालेले बदल आणि नेत्यांचा सुरु असलेला इनकमिंग-आउटगोईंगचा खेळ सर्वच पक्षांना खूपच महागात पडताना मतमोजणीच्या येणा-या आकड्यांवरुन दिसत आहे. यात सर्वात मोठा फटका बसला होता तो राष्ट्रवादी काँग्रेसला. NCP पक्षातून अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश करुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांशी (Sharad Pawar) मोठा दगाफटका केला. मात्र आपल्यासमोर आलेल्या या गंभीर परिस्थितीपुढे मान न झुकवता, हार न मानता NCP अध्यक्ष शरद पवारांनी प्रचारसभेतून जनतेची मनं जिंकली.
त्यात विधानसभेच्या प्रचारतोफा थंडावायच्या 2 दिवस आधी शरद पवारांनी साता-यात भर पावसात केलेली सभा हा चर्चेचा विषय ठरली. किंबहुना या सभेने मते जिंकली असं म्हणायला हरकत नाही. त्याचा परिणाम आजच्या मतमोजणीवर पाहायला मिळतोय. वयाच्या 78 व्या वर्षी भर पावसात भाषण करणारे शरद पवारांनी प्रचाराच्या टप्प्यात सिक्सर मारत लोकांची मने जिंकली.
'सातारा जिल्हा विचारांचा आणि मतांचा पक्का आहे, शिवाजी महाराजांचे विचार खऱ्या अर्थाने जपणारा जिल्हा आहे. त्यामुळे मत कोणाला द्यायचे हे त्याला माहित आहे. मुख्यमंत्री सांगतात आम्हाला पैलवान दिसत नाहीत मात्र याच साताऱ्यातील अनेक पैलवान आज आमच्या सोबत आहेत.' असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमधून बंडखोरी केलेल्या उदयनराजेंवर हल्ला चढवला. 'लोकसभा निवडणुकीच्या वेळी उदयनराजे भोसलेंना साताऱ्यातून उमेदवारी देऊन मी मोठी चूक केली. आता हीच चूक मला दुरुस्त करायची आहे' असे उद्गार त्यांनी काढले होते.