Sharad Pawar गटाची आज बैठक; पक्ष, चिन्ह, नावावर चर्चा

या बैठका अनुक्रमे वायबी सेंटर आणि नेहरु सेंटर येथे पार पडत आहेत.

Maha Vikas Aghadi | (Photo Credits: ANI)

INDIA Meetings in Mumbai: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षासोबत जे जे घडत आहे ते ते सगळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत घडत आहे. भारतीय आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील हा दुर्मिळ योगायोजच म्हणावा. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांसोबत सत्ताधारी गटाकडून असे राजकारण केले जात आहे. दरम्यान, NCP मध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर पक्षाध्यक्ष शरद पवार हे आज (5 ऑगस्ट) आपल्या समर्थकांची (Sharad Pawar Faction) बैठक घेत आहे. मुंबई येथील वाय बी चव्हाण सेंटर येथे ही बैठक पार पडेल. या बैठकीमध्ये पक्ष, पक्षचिन्ह आणि समर्थकांकडून प्रतिज्ञापत्र भरुन घेण्याच्या प्रक्रियेची सद्यास्थिती यावर मंथन होणार असल्याचे समजते.

वायबी सेंटर मुंबई येथे बैठक

वायबी सेंटर येथे पार पडणाऱ्या बैठकीस पक्षाचे प्रमुख नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहीत पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतरही काही नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते. येत्या 15 ऑगस्टपासून शरद पवार हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहेत. तत्पूर्वी या बैठकीत काही धोरणे निश्चित करण्यावर भर दिला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार गटामुळे झालेली फाटाफूट, त्यामुळे उद्भवलेला कायदेशीर पेच आणि लढावी लागणारी न्यायालयीन लढाई, यावर चर्चा होऊ शकते. तसेच, समजा शिवसेना पक्षासारखीच घटना घडली आणि पक्षचिन्ह तसेच पक्षही अजित पवार गटाकडे गेला तर पुढे काय? यावरही चर्चा होणार असल्याचे समजते.

महाविकासआघाडी घटक पक्षांचीही बैठक

दरम्यान, महाविकासआघाडीतील घटक पक्षांचीही एक बैठक आजच मुंबई येथे पार पडणार असल्याचे समजते. मुंबई येथील नेहरु सेंटर येथे पार पडणाऱ्या बैठकीस उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहतील. या बैठकीत आगामी निवडणुका, नजीकच्या काळात मुंबईमध्ये पार पडणारी विरोधकांच्या राष्ट्रीय आघाडीची म्हणजेच इंडिया (INDIA) ची बैठक आदींवर विस्तृत चर्चा होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुंबई, नागपूर, नाशिक यांसारख्या प्रमुख महापालिकांच्या निवडणुका यांवरही चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.