Sachin Waze यांना 90 टक्के हार्ट ब्लॉकेज; वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी वकिलाकडून विशेष न्यायालयात अर्ज दाखल
त्यांना एनआयएने 13 मार्च रोजी अटक केली होती. त्याची कोठडी शनिवारी संपणार आहे.
Sachin Waze Heart Blockage: एनआयए कोर्टाने मुंबई पोलिसांचे माजी अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांचा वैद्यकीय अहवाल मागविला आहे. सचिन वाझे यांच्या वकिलाने न्यायालयात वाझे यांच्या छातीत 90 टक्के ब्लॉकेज (Heart Blockage) असल्याचं सांगितलं होतं. तसेच त्यांना वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी न्यायालयात अर्जदेखील दाखल केला होता. यानंतर एनआयए कोर्टाने वाझे यांचा वैद्यकीय अहवाल मागविला आहे. सचिन वाझे हे अँटिलीया प्रकरण आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. त्यांना एनआयएने 13 मार्च रोजी अटक केली होती. त्याची कोठडी शनिवारी संपणार आहे.
सचिन वाझे यांचे वकील रौनक नाईक यांनी कोर्टाकडे अर्ज केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, छाती दुखण्याबरोबरचं सचिन वाझे यांच्या हृदयात 90 टक्के ब्लॉग्ज आहेत. म्हणून वाझे यांना त्यांच्या हृदयरोग तज्ज्ञाची भेट घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन त्याचा वैद्यकीय उपचारांसाठीचा कोर्स सुरू होऊ शकेल. यानंतर कोर्टाने वाझे यांचा वैद्यकीय अहवाल मागविला आहे. वाझे यांना आज एनआयए कोर्टात हजर केले जाणार आहे. आज यासंदर्भातील रिपोर्ट न्यायालयात दाखवण्यात येणार आहे. (वाचा - मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर येत्या 5 एप्रिलला उच्च न्यायालयात होणार सुनावणी)
एनआयएने सचिन वाझे यांच्याविरूद्ध UAPA च्या अनेक कलमे लागू केली आहेत. यामुळे आता एनआयएला वाझे यांच्या 30 दिवसांची कस्टडी मागण्याचा अधिकार देण्यात आला आहे. तसेच आयपीसी कलमांअंतर्गत एकावेळी केवळ 14 दिवसांची कोठडी मिळते. या व्यतिरिक्त, UAPA अंतर्गत, तपास यंत्रणा 180 दिवसात आरोपपत्र दाखल करू शकते. परंतु आयपीसीमध्ये ही मर्यादा केवळ 90 दिवस आहे.
दरम्यान, 25 फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थाच्या घराबाहेर एक स्कॉर्पिओ सापडला होता. या कारमधून 20 जिलेटिन (स्फोटक) काठ्या जप्त करण्यात आल्या होत्या. तसेच धमकी देणारे पत्रही मिळाले होते. घटनेच्या दुसर्या दिवशी म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी या कारचा मालक मनसुख हिरेन असल्याचे समजले. परंतु 17 फेब्रुवारी रोजी त्याने कार चोरीला गेली असल्याचा अहवाल दाखल केला होता. 6 मार्च रोजी मनसुख हिरेनचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एनआयएकडे देण्यात आली. 13 मार्च रोजी एनआयएने मुंबई पोलिसांचे माजी एपीआय सचिन वाझे यांना अटक केली. मनसुख हिरेन खून आणि अँटिलिया प्रकरणात सचिन वाझे यांची भूमिका समोर आली आहे.