Ratnagiri Flood Situation: कोकणात मुसळधार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती
चिपळूण येथील वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीत वाढ होवू लागल्याने येथेही पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सलग दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. शनिवार मध्यरात्रीपासून पावसाचा आणखी जोर वाढल्याने लांजा तालुक्यातील मुचकुंदी, राजापूरमधील काजळी नदी, चिपळूणमधील वाशिष्टी नदी, खेडमधील जगबुडी नदी आणि संगमेश्वरमधील शास्त्री या नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर शहर आणि रत्नागिरीतील चांदेराई बाजार पेठेत पाणी भरल्याने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. (हेही वाचा - Kokan Weather forecast for Tomorrow: कोकणात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!)
संगमेश्वर परिसरातील भागात देखील पावसाने चांगलाच जोर धरला आहे. चिपळूण येथील वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीत वाढ होवू लागल्याने येथेही पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजापुर बाजार परिसरात चारवेळा पाणी भरल्याने येथील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. तर लांजा येथे कोसळणाऱ्या पावसामुळे मुचकुंदी नदीला पूर आल्याने या पुराचे पाणी चांदेराईच्या बाजारपेठेत शिरले. यामुळे जवळपासच्या गावांचा संपर्क तुटला आहे.
संततधार पावसामुळे रविवारी सकाळी मंडणगड शहरातील गांधी चौकातील पुलाजवळील भराव खचल्याने पुलावरून जाणारी वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली आहे. दरम्यान तालुक्यात दोन दिवस संततधार बरसत असलेल्या पावसामुळे भारजा नदीला पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. जिल्ह्यात एक जुनपासून आतापर्यंत सरासरी दोन हजार आठपेक्षा जास्त मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात रविवारी दिवसभरात मंडणगड तालुक्यात 139.80 मिमी सरासरी जास्त तर चिपळूण तालुक्यात 76.70 मिमी सरासरी एवढ्या कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गतवर्षी 21 जुलैपर्यंत 1453.74 मिली एवढ्या सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे.