Maharashtra Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात आजचे हवामान कसे असेल, IMD कडून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Today's Weather Forecast: राज्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे. अर्थात अनेक ठिकाणे त्याला अपवादही ठरत आहेत. असे असले तरी ज्या भागात पाऊस पडला त्या ठिकाणी नदी, नाले तुडूंब झाले असून दुथडी वाहू लागले आहेत. खास करुन मुंबई शहर उपनगरे, ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. दुसऱ्या बाजूला राज्यातील इतर विभागांतील स्थितीसुद्धा काही वेगळी नाही. हवामान विभागाने (IMD) आजचा हवामानचा अंदाज वर्तवताना म्हटले आहे की, राज्यात आजही (28 जुलै) जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार विविध जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. जाणून घ्या कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट.
आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे. दुसऱ्या बाजूला पुणे आणि सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यातही तोच अलर्ट आहे.
यलो अलर्ट: सिंदुधुर्ग, कोल्हापूर, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ
ठाणे आणि पालघर लगतच्या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईसाठी 'यलो' अलर्ट जारी केला असून, शुक्रवारी (28 जुलै) काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातील पालघर आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता शुक्रवारी सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी मोडकसागर तलाव आज (27 जुलै 2023) रात्री 10:52 वाजता ओसंडून वाहू लागला, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. पावसाचा एकूण रागरंग पाहता आवश्यकता नसेल तर घरातून बाहेर पडणे टाळावे. सुरक्षीत ठिकाणी थांबावे असे अवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे. ठाणे शहरात पावसाने सध्या उघडीप दिली आहे.