कॉंग्रेसनंतर राष्ट्रवादीला मोठा धक्का; राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते-पाटील करणार 'भाजप'मध्ये प्रवेश?

त्यामुळे कॉंग्रेसनंतर शरद पवारांनाही मोठा धक्का बसणार आहे.

Ajit Pawar and Vijaysinh Mohite–Patil (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना काँग्रेसने नगरची जागा सोडली नसल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसवर नाराज आहेत, म्हणून तेही भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवल्या जात आहेत. येत्या 12 एप्रिलला नरेंद्र मोदी हे नगरमधील भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेणार आहेत. या सभेत राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील (Vijaysinh Mohite-Patil)  हेही भाजपच्या मार्गावर चालत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कॉंग्रेसनंतर शरद पवारांनाही मोठा धक्का बसणार आहे.

रणजितसिंह मोहिते पाटीलांनी (Ranjitsinh Mohite-Patil) भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता विजयसिंह मोहिते पाटील काय करणार? हा प्रश्न अनेकांच्या मनात होता. त्यात आता अकलूज इथे 17 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. यावेळी विजयसिंह मोहिते यांनीही पक्ष प्रवेश करावा यासाठी भाजपा नेत्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते. रणजितसिंहच्या भाजपप्रवेशाला विजयसिंहांचा मोठा पाठिंबा होता. त्यामुळेच रणजित सिंह मोहिते पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश करू शकले. (हेही वाचा: मोहिते-पाटील यांचा फोन स्विच ऑफ होता, राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणूक तिकीट त्यांनाच तर देणार होते)

दरम्यान, सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला, भाजपकडून त्यांना लोकसभेची उमेदवारीही देण्यात आली आहे. 19 मार्च रोजी राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा सोपवित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. 23 मे नंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची भूमिका होती, मात्र राधाकृष्ण विखे पाटील हे येत्या 12 एप्रिलला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.