Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava: मुंबई मध्ये आज रोजगार मेळावा चं आयोजन; 5590 रोजगार देण्याचं लक्ष्य
मुंबई मध्ये आज (10 डिसेंबर) राणीचा बाग, भायखळा (पूर्व) भागामध्ये “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” (Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava) आयोजित करण्यात आला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध नामवंत कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र, सेवा क्षेत्र यामध्ये 5 हजार 590 रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलेल्या माहिती नुसार मेळाव्यात या नोकऱ्यांसाठी कंपन्यांकडून थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत, त्याचबरोबर नोकरी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन सुद्धा लोढा यांनी केले आहे. मेळाव्यामध्ये मुंबई शहर येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच तज्ज्ञामार्फत उद्योजकता मार्गदर्शन आणि करियरविषयक समुपदेशनही करण्यात येणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन १० डिसेंबरला सकाळी १० वाजता मंत्री लोढा, शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कौशल्य विकास विभागाचे सचिव तथा आयुक्त डॉ. रामास्वामी एन, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर सुद्धा उपस्थितीत असणार आहेत.
सहभागी कंपन्या:
बीव्हीजी इंडिया, आयसीजे, स्पॉटलाईट, स्मार्ट स्टार्ट, बझ वोर्क, टीएनएस इंटरप्रायझेस, युवाशक्ती, इम्पेरेटिव्ह, हिंदू रोजगार डॉट कॉम, एअरटेल, रोप्पन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस, फास्ट ट्रॅक मॅनेजमेंट सर्व्हिसेस, अपोलो होम हेल्थकेअर, स्टेलर सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्व्हिसेस इत्यादी उद्योग, कंपन्या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत.
खालील क्षेत्रातील पदे उपलब्ध:
बँकिग, आयटीआयएस, टुरिझम, हॉस्पिटिलिटी, एचआर, ॲप्रेंटिसशीप, डोमॅस्टिक वर्कर, इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट तसेच मिडीया अँड एंटरटेनमेंट अशा विविध क्षेत्रातील पदांची भरती या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासाठी दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग पदवी इत्यादी पात्रताधारक उमेदवार मेळाव्यात सहभागी होऊन मुलाखती देऊ शकतात.
उमेदवारांना आर्थिक साहाय्य देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार
या मेळाव्यात इच्छुक उमेदवारांकरिता आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार आहे. नामांकित कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत अप्रेंटिसशिपची पदेही औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून (आयटीआय) एक किंवा दोन वर्षाचा तांत्रिक अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकरिता उपलब्ध असणार आहेत.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ इत्यादी महामंडळांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल या मेळाव्यात लावण्यात येणार आहेत. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही मेळाव्यात सहभाग असणार आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत राज्यात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून या विविध प्रशिक्षण योजनांची माहितीही या मेळाव्यात मिळणार आहे.
महाराष्ट्रातील युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम राबवीत आहे. नुकतेच कौशल्य विकास विभागाने १ लाख २५ हजार रोजगार देण्यासाठी विविध कंपन्यांबरोबर सामंजस्य करार केले आहेत. राज्यभरात रोजगार मेळावा उपक्रमाला चालना देण्यासाठी येत्या काळात ३०० रोजगार मेळावे घेण्याचे नियोजन असून, उद्योग आणि बेरोजगार उमेदवारांमध्ये समन्वय साधण्यासाठी येत्या दोन महिन्यात मोबाईलवर महास्वयम ॲप उपलब्ध करून देण्यात असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी दिली आहे.
कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिलेल्या माहिती नुसार रोजगार मेळाव्यांसाठी आतापर्यंत 60 हजार रुपयांची खर्च मर्यादा होती, जी आता शासनाने ५ लाख रुपयांपर्यंत वाढविली आहे. यामुळेच महाराष्ट्रात रोजगार मेळावे प्रभावी पद्धतीने आयोजित करणे शक्य होत आहे.
महिलांसाठी गॅस स्टेशन, पेट्रोल पंप सेवकाचे प्रशिक्षण
काही दिवसांपूर्वी, मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व रेवती रॉय फाऊंडेशन यांच्यामार्फत महिलांसाठी ‘गॅस स्टेशन, पेट्रोल पंप सेवक’ या अभिनव अभ्यासक्रमाचा नुकताच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला होता.
यामधून प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना थेट गॅस स्टेशन, पेट्रोल पंप येथे रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत 100 महिला लाभार्थींना प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षणाचा कालावधी 7 दिवसांचा राहणार आहे. संस्थेमार्फत 90 दिवसांचे ऑन जॉब ट्रेनिंगही सुद्धा देण्यात येईल. भारत सरकारच्या अखत्यारीतील पेट्रोलियम कंपन्यांच्या गॅस स्टेशन, पेट्रोल पंप येथे प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना मासिक 12 ते 15 हजार रुपये वेतनावर नियुक्त करण्यात येईल.