Palghar Shocker: लिव्ह इन पार्टनरची हत्या करून बेडमध्ये लपवला मृतदेह; फर्निचर विकून झाला फरार, तरुणाला ट्रेनमधून अटक
शाह ट्रेनने पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्याचे लोकेशन ट्रेस केले गेले. मध्य प्रदेशातील नागदा येथून त्याला अटक करण्यात आली.
महाराष्ट्रात आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करून पळून गेलेल्या तरुणाला रेल्वेतून अटक करण्यात आली आहे. हार्दिक शाह असे आरोपीचे नाव असून तो 27 वर्षांचा आहे. मेघा धनसिंग तोरवी, वय 37 असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना पालघरमधील नालासोपारा येथील आहे. हे जोडपे तीन वर्षांपासून डेटिंग करत होते आणि गेल्या सहा महिन्यांपासून एकत्र राहत होते. काही दिवसांपूर्वी ते त्यांच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये रहायला आले होते.
रिपोर्ट्सनुसार, मेघाची हत्या केल्यानंतर शाहने मृतदेह बेडच्या आत एका बॉक्समध्ये लपवून ठेवला होता. पोलिसांनी त्याला मंगळवारी (14 फेब्रुवारी 2023) अटक केली. याप्रकरणी पालघर जिल्ह्यातील तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक आणि मेघा नालासोपारा येथील सीता सदन सोसायटीत भाड्याने राहत होते. या जोडप्याने आपले लग्न झाल्याचे रिअल इस्टेट एजंट, घरमालक आणि शेजाऱ्यांना सांगितले होते. पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हार्दिक हा बेरोजगार होता. मेघाच्या कमाईतून घराचा खर्च चालत होता. यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. याच कारणावरून हार्दिकने त्याची हत्या केली. यापूर्वी दोघांमध्ये भांडण झाल्याची तक्रारही शेजाऱ्यांनी केली होती. मेघा नर्स म्हणून काम करत होती.
मेघाची हत्या केल्यानंतर हार्दिक शाह घरातून फरार झाला होता. घरातून उग्र वास आल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर बेडच्या आत बनवलेल्या बॉक्समधून मेघाचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत सापडला. वरिष्ठ निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या हवाल्याने एका अहवालात गेल्या आठवड्यात खुनाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (हेही वाचा: Delhi Horror: दिल्ली मध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती; 24 वर्षीय तरूणाने लिव्ह इन पार्टनरचा जीव घेऊन त्याच दिवशी केले दुसर्या मुलीशी लग्न)
मेघाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला होता. शाह ट्रेनने पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्याचे लोकेशन ट्रेस केले गेले. मध्य प्रदेशातील नागदा येथून त्याला अटक करण्यात आली. रिपोर्ट्सनुसार, हार्दिकने आपल्या बहिणीला हत्येबद्दल सांगितले होते आणि फ्लॅटमधून पळून जाण्यापूर्वी अनेक फर्निचरच्या वस्तू विकल्या होत्या.