सावधान! सुनिश्चित वेळेत पाऊस पडला नाही तर मुंबईकरांवर येऊ शकते पाणीकपातीचे भयाण संकट

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असून मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत सात तलावांमध्ये मिळून फक्त 15 ते 17 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (photo Credit : pixabay)

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असून मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत सात तलावांमध्ये मिळून फक्त 15 ते 17 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तलावांतील उपलब्ध साठ्यावर जूनपर्यंत पाणीपुरवठा करणे पालिकेला शक्य होणार असून पाऊस लांबल्यास राखीव पाणीसाठ्याच्या आधारे मुंबईकरांची जुलैपर्यंतची तहान भागवली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी, भातसा तसेच मध्य वैतरणा या धरणांमधून पाणीकपातीमुळे दरदिवशी 3 हजार 515 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. सर्व धरणांमध्ये 1 ऑक्टोबर रोजी 14 लाख 50 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा असल्यास वर्षभर विनाकपात पुरवठा करणे पालिकेला शक्य होते. मागील वर्षी अपुऱ्या पावसामुळे तलावांमध्ये 10 टक्के साठा कमी झाल्याने वर्षभर 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.

15 मेपर्यंत सर्व धरणांमध्ये मिळून 1 लाख 80 हजार ते दोन लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण पाणीसाठ्याच्या फक्त 15 ते 17 टक्के एवढा हा साठा आहे. मागील वर्षी मेमध्ये 4 लाख 27 हजार 777 दशलक्ष लिटर म्हणजे 39 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा असलेल्या साठ्याच्या आधारे जूनच्या अखेरपर्यंत पालिकेला पाणीपुरवठा करता येणार आहे. मात्र पाऊस लांबणीवर गेल्यास राखीव साठ्याला हात घालावा लागणार आहे.

World Water Day 2019: धोका ओळखा, पाणी वाचवा; अन्यथा पृथ्वीवर जीवसृष्टीचा विनाश अटळ

मुंबईकरांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी पालिकेने राज्य सरकारकडून भातसा आणि अप्पर वैतरणातील राखीव साठ्याचा वापर करण्याची परवानगी घेतली आहे. त्यामुळे मुंबईकरांना जुलैपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा करण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.