IPL Auction 2025 Live

शिवसेना नाही तर नागपूर पोलिसांकडून 10 रुपयात जेवणाची थाळी; वाचा सविस्तर

हा उपक्रम राबवला आहे नागपूर पोलिसांनी. हिवाळी अधिवेशनासाठी तैनात असलेल्या पोलिसांना 10 रुपयात जेवणाची थाळी मिळत आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकांआधी शिवसेनेने अनेक घोषणा केल्या होत्या. त्यातीलच एक घोषणा म्हणजे राज्यात 10 रुपयांमध्ये जेवणाची थाळी उपलब्ध करुन देणे. निवडणुका होऊन, निकालही लागला, त्यानंतर शिवसेनेकडे मुख्यमंत्री पदही आलं, मात्र 10 रुपयात (Food in 10 Rupees)  राज्यभर जेवणाची थाळी मिळणार हे आश्वासन अद्याप पूर्ण झालेलं नाही.

शिवसेनेकडून हे आश्वासन पूर्ण झालं नसलं तरी, नागपूरमध्ये मात्र 10 रुपयांमध्ये जेवणाची थाळी देण्यात येत आहे. हा उपक्रम राबवला आहे नागपूर पोलिसांनी. हिवाळी अधिवेशनासाठी तैनात असलेल्या पोलिसांना 10 रुपयात जेवणाची थाळी मिळत आहे.

नागपुरात आजपासून (16 डिसेंबर) हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. या हिवाळी अधिवेशनासाठी बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांसाठी नागपूर पोलिसांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणाजवळ 10 रुपयांमध्ये जेवणाची थाळी उपलब्ध करून दिली आहे. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे पोलिसांना काम करत असताना जेवणासाठी कुठेही जाण्याची गरज पडू नये.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनासाठी तब्बल 6 हजार पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. त्यातील 2 हजार पोलीस कर्मचारी हे राज्याबाहेरुन आले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागवला बलात्कार प्रकरणातील नवा अहवाल; आरोपींना 100 दिवसांत फाशी देण्याची अहवालात असणार तरतूद

नागपूरचे पोलीस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय यांनी माध्यमांशी या विषयी बोलताना सांगितले की, “पोलिसांना हिवाळी अधिवेशन काळात जेवणाचा भत्ता मिळतो. मात्र, त्यांना वेळच्या वेळी चांगलं जेवण मिळेलच याची काही निश्चिती नसते. त्यामुळे नागपूर पोलिसांचं हे अभियान बाहेरून आलेल्या पोलिसांसाठी नक्कीच फायद्याचं ठरेल.”

दरम्यान नागपूर पोलिसांनी जरी हा उपक्रम यशस्वी करून दाखवला असला तरी, शिवसेना आपलं आश्वासन कधी पूर्ण करणार या बाबत अजून प्रश्नचिन्हच आहे.