Maharashtra HSC Exam 2021 Update: महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय नाही, वर्षा गायकवाड यांनी दिली 'ही' महत्त्वाची माहिती

याबाबत आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. मात्र यावर आज अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

Varsha Gaikwad (Photo Credits: Twitter)

Maharashtra HSC Board Exam 2021: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षण मंडळ काय निर्णय घेते याकडे विद्यार्थ्यांसह सर्व पालकांचे लक्ष लागले आहे. यात काल (1 जून) रोजी केंद्र सरकारने CBSE च्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर गुजराज, हरयाणा आणि मध्यप्रदेश या राज्यांनी देखील आपापल्या राज्य बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. मात्र महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. याबाबत आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. मात्र यावर आज अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

“शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाला ही फाईल पाठवत आहोत. आज किंवा उद्या त्यांची बैठक होईल. त्यात ते फाईलवर निर्णय घेतील आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला अतिरिक्त माहिती देऊ. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व निर्णय हे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेतले जात आहेत. त्यानुसार आम्ही ती फाईल त्यांच्याकडे पाठवली आहे”, असं वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितलं.हेदेखील वाचा- Covid-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांना मिळणार 5 लाख रुपयांची आर्थिक मदत; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच राज्य सरकारची भूमिका राहिली आहे. आता आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर त्यासंदर्भात निर्णय जाहीर करण्यात येईल”, असं देखील शिक्षणमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

या सर्व पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेतं, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवण्यात आलेला प्रस्ताव मान्य होणार का? नेमका निर्णय कधी जाहीर केला जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.