Mumbai: मुंबई ते ठाणे मुख्य रस्ता चार दिवस राहणार बंद, वाहतुकीवर होणार परिणाम
ठाणे शहरातील आनंदनगर सिग्नलपासून हायपरसिटी मॉल, वाघबी पूल, घोडबंदर रोड येथे गिट्टी टाकण्याचे काम सुरू होणार आहे.
मुंबई (Mumbai) आणि ठाण्यात (Thane) राहणाऱ्या लोकांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही मुंबईहून ठाण्याला जात असाल तर पुढील चार दिवस तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मुंबई ते ठाण्याचा रस्ता पुढील चार दिवस बंद राहणार आहे. ठाणे शहरातील आनंदनगर सिग्नलपासून हायपरसिटी मॉल, वाघबी पूल, घोडबंदर रोड येथे गिट्टी टाकण्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे घोडबंदर रोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गांवरून जाणाऱ्यांना पर्यायी मार्ग वापरण्याची सूचना करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे काम 13 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी याबाबत माहिती दिली आहे. अशात घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मुंबईतून जाणाऱ्या अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शनपासून प्रवेश बंद करण्यात आला आहे. हेही वाचा Dombivali: डोंबिवली पुर्व आणि पश्चिममध्ये 18 ऑक्टोंबरला पाणीपुरवठा 12 तास राहणार बंद
अशा वाहनांचा प्रवेश बंद केल्याने या बाजूने जाणाऱ्या वाहनांना कापूरबावडी वाहतूक विभागाकडून वळून खारेगाव टोलनाका, माणकोली, अंजूरफाटा मार्गे ठाण्यात प्रवेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशातच मुंब्रा कळव्यामार्गे घोडबंदरकडे जाणाऱ्या इतर अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथूनही प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या गाड्यांना आता खारेगाव खाडी पुलाखालील कशेळी, अंजूरफाटा, गायमन मार्गे वळसा घालून टोलनाका, माणकोली, अंजूरफाटा या पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चार दिवस हे काम सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत वाहतूक कोंडीची समस्या झपाट्याने वाढणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याचा पर्याय आहे, त्यांना तो पर्यायही वापरता येणार आहे. लोकल ट्रेनच्या प्रवासात वाहतुकीची समस्या राहणार नाही आणि इच्छित स्थळी पोहोचणे सोपे होईल.