मुंबई उपनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: चेंबूर ते वर्सोवा चे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल घ्या जाणून
महायुती, आघाडी, मनसे आणि अपक्षांकडून निवडणूकीच्या रिंगणात कोण उतरलं आहे?
Maharashtra Assembly Election 2019: महाराष्ट्राच्या विधानसभेवर (Maharashtra Vidhan Sabha Elections) झेंडा फडकवण्यासाठी सारेच पक्ष निवडणूकीच्या रणांगणात उतरले आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरामध्येही सारेच पक्ष विजयाचा पताका फडकवण्यासाठी सज्ज झाले आहेत. महाराष्ट्रातील कोकण विभगात मुंबई आणि मुंबई उपनगर विधानसभा संघांचा समावेश होतो. विधानसभेवर कब्जा मिळवण्यासाठी मुंबई शहरातील विधानसभा मतदार संघांवरही लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. मग पहा या मुंबई उपनगर विधानसभा मतदारसंघातील अणुशक्ती नगर,चेंबूर, मानखुर्द शिवाजीनगर, वर्सोवा या मतदार संघांमध्ये कोणत्या पक्षाचं प्राबल्य आहे. महायुती, आघाडी, मनसे आणि अपक्षांकडून निवडणूकीच्या रिंगणात कोण उतरलं आहे? इथे पहा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ चा सारे अपडेट्स.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ
अणुशक्ती नगर विधानसभा मतदार संघ
अल्पसंख्यांक आणि दलित मतदारांचं प्रामुख्याने प्राबल्य असणार्या अणुशकतीनगर विधानसभा मतदार संघामध्ये अनेक वर्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार नवाब मलिक यांचं वर्चस्व होतं. मात्र 2014 च्या निवडणूकीमध्ये शिवसेनेच्या तुकाराम काते यांनी आमदारकी मिळवली होती. यंदाच्या निवडणूकीमध्ये अणुशक्ती नगर विधानसभा मतदार संघातून तुकाराम काते विरूद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवाब मलिक, मनसेचे विजय रावराणे असा मुकाबला रंगणार आहे.
चेंबूर विधानसभा मतदार संघ
चेंबूर हा मुंबई उपनगरातील एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदार संघामध्ये शिवसेनेचे प्रकाश पातर्पेकर यांच्याविरूद्ध कॉंग्रेसचे चंद्रकांत हांडोरे आणि मनसेचे कर्ण दुनबळे यांच्यामध्ये लढत होणार आहे.
मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ
मुस्लीम मतदार, बेकायदा बांधकाम-झोपडपट्टींची वाढती संख्या अशी या मतदारसंघाची ओळख आहे. त्यामुळे समान्य नागरी समस्या या भागातील मोठी डोकेदुखी आहे. अबु आझमी हे मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. यंदा त्यांच्या विरोधात महायुतीकडून शिवसेनेचे विठ्ठल लोकरे निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
वर्सोवा विधानसभा मतदार संघ
वर्सोवा विधानसभा मतदार संघामध्ये मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गीय मतदारांचं वर्चस्व आहे. यामध्ये अनेक मुस्लिम मतदार आहेत. सध्या भाजपाच्या आरती लव्हेकर या विद्यमान आमदार आहेत. यंदा निवडणूकीच्या रिंगणात डॉ. भारती लव्हेकर यांना कॉंग्रेसच्या बलदेव बसंतसिंग खोसा आणि संदेश देसाई यांचं आव्हान आहे.
सध्या अस्तित्त्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपणार आहे. 21 सप्टेंबरला निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करत निवडणूकीची तारिख जाहीर केली आहे. 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर 24 ऑक्टोबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.