Mumbai MHADA Lottery 2024: म्हाडाकडून मुंबईमधील 2030 घरांच्या विक्रीची सोडत जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा व कुठे कराल अर्ज
व्यक्तींच्या पालकांचे किंवा भावंडांचे उत्पन्न हे कौटुंबिक उत्पन्न मानले जात नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Mumbai MHADA Lottery 2024: महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच म्हाडाच्या (MHADA) मुंबई विभागातील घरांच्या लॉटरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांची प्रतीक्षा संपली आहे. म्हाडाने 2030 घरांची सोडत जाहीर केली आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण 2,030 युनिट्समध्ये मध्यम उत्पन्न गट (MIG) श्रेणीमध्ये सर्वाधिक घरे म्हणजेच जवळजवळ 768 अपार्टमेंट्स असतील. लॉटरीसाठी उपलब्ध असलेल्या घरांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त घरे ही कमी उत्पन्न गटासाठी (LIG) असून त्यांची संख्या 627 अपार्टमेंट इतकी आहे.
आर्थिक दुर्बल विभाग (EWS) श्रेणीमध्ये 359 युनिट्स आणि उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) अपार्टमेंटची किमान संख्या 276 असेल. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) संजीव जयस्वाल यांनी जुलै 2024 मध्ये सांगितले होते की, मुंबईसाठी सप्टेंबरमध्ये लॉटरी काढण्याचे त्यांचे ध्येय आहे. आता लवकरच या घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे.
उत्पन्न मर्यादा-
म्हाडाच्या नियमांनुसार, ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न वार्षिक 6 लाखांपर्यंत आहे ते आर्थिक दुर्बल विभाग श्रेणीतील घरासाठी अर्ज करू शकतात. ज्यांचे उत्पन्न 6 लाख ते 9 लाख दरम्यान आहे ते कमी उत्पन्न गटाअंतर्गत अर्ज करू शकतात. ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 9 लाख ते 12 लाख दरम्यान आहे ते मध्यम उत्पन्न गट श्रेणी अंतर्गत अर्ज करू शकतात आणि ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न वार्षिक 12 लाखांपेक्षा जास्त आहे ते उच्च उत्पन्न श्रेणी अंतर्गत अर्ज करू शकतात.
केवळ पती-पत्नीचे वार्षिक उत्पन्न हे म्हाडाच्या लॉटरीच्या उद्देशाने कौटुंबिक उत्पन्न मानले जाते. व्यक्तींच्या पालकांचे किंवा भावंडांचे उत्पन्न हे कौटुंबिक उत्पन्न मानले जात नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोणत्या भागात आहेत घरे?
आगामी लॉटरीतील ही घरे विक्रोळी, मालाड, गोरेगाव, पवई आणि वडाळा यासह अनेक भागात आहेत. गोरेगावमधील काही प्रीमियम 3 बीएचके अपार्टमेंट्सही म्हाडाच्या 2024 च्या लॉटरीमध्ये विकले जाणार आहेत.
जाणून घ्या महत्वाच्या तारखा कुठे कराल अर्ज-
म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार म्हाडा लॉटरी 2024 साठी अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. गृहखरेदीदार https://housing.mhada.gov.in/ वर लॉटरी संबंधित अपडेट्सचा मागोवा ठेवू शकतात. (हेही वाचा: Mumbai Marathi Signboard Rule: मराठी नावांबाबत BMC कडून जवळपास 95,000 दुकानांची तपासणी; 3,388 आस्थापनांनी केले उल्लंघन, वसूल केला 1.35 कोटी दंड)
ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला 9 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजेपासून सुरूवात होणार आहे. या सोडतीची जाहिरात 8 ऑगस्ट 2024 रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रांमध्ये तसेच म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत 4 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत 13 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आझे.