Mumbai Local Mega Block: वर्षाच्या पहिल्याचं दिवशी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक, रेल्वे प्रशासनाकडून सुधारित वेळापत्रक जारी

म्हणजे मुंबई लोकल रेल्वे प्रशासनाकडून आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

Mumbai Local | (Photo Credit - Twitter)

आज २०२३ या नव्या वर्षाचा पहिला दिवस. मुंबईकरांकडून नव्या वर्षाचं धुमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. पण वर्षाच्या पहिल्याचं दिवशी मुंबईकरांची जिवनवाहीनी सुट्टीवर गेली आहे. म्हणजे मुंबई लोकल रेल्वे प्रशासनाकडून आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. लोकल ट्रेन आणि मार्गाच्या देखभालीच्या कामासाठी दर रविवारीचं मुंबई लोकल प्रशासनाकडून हा मेगाब्लॉक घेण्यात येतो. पण आजचा मेगाब्लॉक विशेष अडचण निर्माण करणारा आहे कारण आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि याचं पार्श्वभुमिवर मुंबईकर नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करण्यास मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. शहरातील मरीन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया, राणीची बाग, गिरगाव बिच, जूहू बिच अशा विविध ठिकाणांवर मोठी गर्दी करतात. मुंबईच्या विविध भागांसह मुंबई उपनगरातून शहरात दाखल होणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. तरी रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांना वाहतुकीत अडचण येणार असल्याची शक्यता आहे.

 

तरी तुम्ही नवीन वर्षाच्या मुहूर्तावर घराबाहेर पडण्याचं नियोजन करत असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे. मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. म्हणजे कल्याण, डोंबिवली, बलापूर, कसारा, ठाणे आणि नवी मुंबई या उपनगरातून मुंबई शहरात येणाऱ्या नागरिकांना मेगाब्लॉकचा फटका बसण्याची शक्यता आहे. तरी मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वेकडून आज लोकल प्रवासाचं सुधारीत वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. (हे ही वाचा:- Mumbai Health Centres: मुंबईमध्ये 26 जानेवारीपर्यंत सुरु होणार 100 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे केंद्रे; गरिबांना मिळणार स्वस्त आणि दर्जेदार आरोग्य सेवा)

 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 वाजेपर्यंत  सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 वाजेपर्यंत अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या दोन्ही मार्गावरील लोकल सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशीराने पोहोचेल. तसेच हार्बर मार्गावर पनवेल/बेलापूर येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत  सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.