Sameer Wankhede यांच्या समर्थनार्थ उतरले मंत्री Ramdas Athawale; घेतली क्रांती रेडकर व समीर वानखेडेंच्या वडिलांची भेट

ते आमच्या पाठीशी उभे आहेत कारण त्यांना प्रत्येक दलिताची काळजी आहे. नवाब मलिक यांचे आतापर्यंतचे सर्व आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे.

Ramdas Athawale | (Photo Credit : Facebook)

आर्यन खान ड्रग प्रकरणाचा तपास करत असलेल्या एनसीबीचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) सतत हल्ला करत आहेत. समीर वानखेडे यांच्यावर खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. वानखेडे हे मुस्लीम असल्याचे मलिक म्हणत आहेत. आता समीर वानखेडे आणि नेते नवाब मलिक यांच्यातील लढतीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांची एन्ट्री झाली आहे. समीर वानखेडे यांचे वडील आणि पत्नी क्रांती रेडकर यांनी रविवारी मुंबईत केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली.

या बैठकीनंतर आठवले म्हणाले, ‘समीर वानखेडे हे दलित आहेत त्यामुळे त्यांचा छळ केला जात आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्यावर खोटे आरोप करणे बंद करावे. तसेच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाची बदनामी करण्याचे षडयंत्र थांबवावे. रिपब्लिकन पक्ष वानखेडे व त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे. समीरचे काहीही नुकसान होणार नाही. नवाब मलिक म्हणतात पिक्चर अजून बाकी आहे. पण या पिक्चरमध्ये माझा रोल बाकी आहे.’

रामदास आठवले यांची भेट घेतल्यानंतर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे म्हणाले, नवाब मलिक म्हणतात की, एका दलिताचा हक्क आम्ही हिरावून घेतला परंतु आम्ही स्वतः दलित आहोत. तुम्हाला काही सांगायचे असेल तर कोर्टात जा. माझ्या मुलाने तुमच्या जावयाला अटक केली म्हणून तुम्ही खोटे आरोप करत आहात. माझा मुलगा किंवा मी कधीही धर्मांतर केलेले नाही, हे आरोप खोटे आहेत. (हेही वाचा: Drugs Case: ड्रग्ज संबंधित आरोपांवरुन भाजप नेते मोहित कंबोज आक्रमक, नवाब मलिक यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा खटला दाखल)

समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणाल्या, ‘आम्ही रामदास आठवले यांची भेट घेतली. ते आमच्या पाठीशी उभे आहेत कारण त्यांना प्रत्येक दलिताची काळजी आहे. नवाब मलिक यांचे आतापर्यंतचे सर्व आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे.