Markadwadi Ballot Paper Voting: मारकडवाडी येथे बॅलेट पेपरवर मतदान, गावकऱ्यांना EVM वर संशय; गावाला छावणीचे स्वरुप
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघात येणारे हे गाव महाराष्ट्रात चर्चेला आले आहे. उत्तम जानकर आणि राम सातपुते यांच्यात या मतदारसंघात विधानसभेसाठी प्रमुख लढत पार पडली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल (Maharashtra Assembly Election Results) जाहीर झाले आणि भाजप महायुतीला मिळालेले धक्कादायक बहुमत पाहून सर्वच स्थरातून आश्चर्य व्यक्त होऊ लागले. राजकीय विश्लेषकच नव्हे तर सामान्य नागरिकही मतदानाची आकडेवारी आणि टक्केवारी पाहून अवाक झाले. त्यातूनच ईव्हीएम (EVM) गडबड झाल्याचा संशय पुढे आला. ज्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी (Markadwadi) हे गाव बॅलेट पेपरवर मतदान (Ballot Paper Voting) घेण्यास प्रवृत्त झाले. त्यामुळे गावात आज आज (3 डिसेंबर) बॅलेट पेपरवर पुन्हा एकदा मतदान (Markadwadi Ballot Paper Voting) प्रक्रिया पार पडत आहे. अर्थात, अशा प्रकारे मतदान घेता येत नाही, असे प्रशासनाने म्हटले आहे. त्यासाठी पोलिसांनी गावात जमावबंदी आदेश लागू केला आहे. असे असले तरी, स्थानिक आमदार उत्तम जानकर आणि गावातील ग्रामस्थ मतदान प्रक्रियेवर ठाम आहेत. आम्ही पोलिसांच्या लाठ्या खाऊ, गोळ्या घातल्या तरी चालतील पण मतदान घेऊच, असे ग्रामस्थ म्हणत आहेत.
गावकरी इरेला पेटले
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये माळशिरस तालुक्यात भाजपचे तत्कालीन आमदार राम सातपुते मैदानात होते. त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उत्तम जानकर यांना उमेदवारी दिली होती. संपूर्ण राज्याप्रमाणे या मतदारसंघातही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (Electronic voting machine) म्हणजेच ईव्हीएम (EVM) द्वारे मतदान पार पडले. निकाल आला तेव्हा उत्तम जानकर विजयी झाले तर राम सातपुते यांचा पराभव झाला. मारकडवाडी गाव जानकर समर्थक मानले जाते. असे असताना या गावातून सातपूते यांना मताधिक्य मिळालेच कसे? असा सवाल गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे आपण सर्व गाव मिळून पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर मतदान घेऊ. ज्यामुळे ईव्हीएममध्ये झालेले मतदान खरे आहे की नाही, याबाबत आपल्यालाच माहिती कळेल, असे गावकऱ्यांनी ठरवले. गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्धार केला आहे. (हेही वाचा, SC On Ballot Paper Voting: सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका)
सातपुते यांना मिळालेल्या मतांमुळे गावकरी आवाक!
माळशिरस विधानसभा मतदारसंघात मोहितेपाटील आणि जानकर असे दोन परस्परविरोधी गट एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. आजवर हे दोन्ही गट एकमेकांविरोधात लढत होते. असे असले तरी या निवडणुकीत प्रथमच हे दोन्ही गट एकत्र लढताना पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीतही जानकर गटाने मोहितेपाटील गटास सहकार्य केलेल होते. असे असताना या गावातातून राम सातपुते यांना मताधिक्य गेलेच कसे? असा सवाल गावकऱ्यांकडून उपस्थित केला जाऊ लागला. त्यातूनच सर्व गावाने मिळून पुन्हा एकदा ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा, EVM Hack Claim: ईव्हीएम हॅक केल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल' निवडणूक आयोगाने 'तो' व्हिडिओ खोटा ठरवला)
मारकडवाडी गावातून जानकर आणि सातपुते यांना मिळालेले मतदान
उत्तम जानकर: 1003 मतं
राम सातपुते: 843
गावकऱ्यांचा दावा असा की, राम सातपुते यांना या गावात इतकी मते मिळणे शक्यच नाही. त्यांना या गावात फार फार तर 150 मते मिळू शकतात. असे असतानाही त्यांना मिळालेली मते आश्चर्यकारक आहेत. त्यामुळे हा सगळा घोळ ईव्हीएमचा तर नाही ना? असा सवाल गावकरी करत आहेत. त्यामुळेच या ठिकाणी आज पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक पार पडत आहे.