Bomb Hoax Call: मंत्रालय उडवून देण्याची धमकी देणारा 34 वर्षीय तरूण अहमदनगरमधून ताब्यात; मुख्यमंत्र्यांशी संंपर्क न झाल्याने दिली धमकी

त्याने फोन केला तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेमध्ये होता का? याचा तपास सुरू आहे. त्याने काल 112 हेल्पलाईन वर फोन केला होता. नाव न सांगता त्याने मुख्यमंत्र्यांशी बोलू द्या अन्यथा मंत्रालय बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी दिली.

Call | Pixabay.com

मुंबई (Mumbai) मध्ये काल (31 ऑगस्ट) 15 दिवसांत दुसर्‍यांदा मंत्रालय (Mantralaya) उडवून देण्याचा धमकीचा कॉल आला आणि एकच खळबळ उडाली. दरम्यान हा धमकीचा कॉल करणारा व्यक्तीचा सुगावा लागला आहे. मंत्रालय उडवून देणारा कॉल करणारी व्यक्ती 34 वर्षीय स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा मुलगा आहे. अहमदनगर (Ahmednagar) मधील शेवगाव तालुक्यामधून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. परीक्षेसंबंधी सूचना करण्यासाठी त्याला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे होते. पण सीएम शिंदे यांच्यासोबत संपर्क होऊ न शकल्याने त्याने हा चूकीचा पर्याय निवडला.

बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे असं या मुलाचं नाव आहे. त्याने फोन केला तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेमध्ये होता का? याचा तपास सुरू आहे. त्याने काल 112 हेल्पलाईन वर फोन केला होता. नाव न सांगता त्याने मुख्यमंत्र्यांशी बोलू द्या अन्यथा मंत्रालय बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी दिली.

धमकीच्या कॉलची माहिती मंत्रालयाचा सुरक्षा विभाग आणि मुंबई पोलिसांना कळविण्यात आली. त्यांनी मंत्रालयात तपासणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. संध्याकाळी याच वेळेच्या सुमारास मंत्रालय परिसरात मेट्रोच्या कामासाठी ब्लास्ट करण्यात आले त्यामध्ये मंत्रालयाच्या आणि पार्किंग मधील काही गाड्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत.

पोलिस दुसरीकडे कॉल करणार्‍या व्यक्तीचा मागोवा घेत असताना त्यांनी हसनापूर गाठले. हसनापूरच्या शेवगाव मधून त्यांनी बाळकृष्ण ढाकणेला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीमध्ये तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता आणि ही पारदर्शक व्हावी या मागणीसाठी तो मुख्यमंत्र्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याचा संपर्क न झाल्याने त्याने थेट मंत्रालय उडवण्याची धमकी दिली.