Maharashtra Weather Update: राज्यात तापमान वाढले तरी गारठा कायम; खान्देश, विदर्भात हवामान विभागाकडून गारपीठीची शक्यता
या आधी झालेल्या गारपीठीमुळे शेतकऱ्यांचे आगोदरच नुकसान झाले आहेत. त्यातच आता पुन्हा गारपीठ झाली तर आणखी नुकसानाला तोंड द्यावे लागण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते.
राज्यातील तापमानात काही प्रमाणात वाढ झाली असली तरी गारठा अद्यापही कायम आहे. प्रामुख्याने खान्देश आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका (Maharashtra Weather Update) पाहायला मिळत आहे. पंश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी थंडी हुडहुडी भरवत आहे. दरम्यान, येत्या 21 आणि 22 जानेवारीला विदर्भ (Vidarbha ) आणि खान्देशातील (Khandesh) काही भागांमध्ये तुरळक प्रमाणात गारपीठ (Hailstormt ) होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या आधी झालेल्या गारपीठीमुळे शेतकऱ्यांचे आगोदरच नुकसान झाले आहेत. त्यातच आता पुन्हा गारपीठ झाली तर आणखी नुकसानाला तोंड द्यावे लागण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते.
हवामान विभागाने अंदाज व्यक्त करत म्हटले आहे की, आगामी काही काळात राज्यातील थंडी हळूहळू कमी होऊ लागेल. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही सातारा, सांगली , कोल्हापूर , सोलापूर जिल्ह्यातही थंडी कमी होऊ लागेल. उर्वरीत महाराष्ट्रात वातावरण निवळण्यास काहीसा अवधी लागेल. हे वातावरण रब्बी हंगामातील पिकांसाठी पूरक असेल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. (हेही वाचा, Doppler Weather Radar: मुंबईसाठी बहुप्रतिक्षित दुसरे डॉपलर वेदर रडार आज होणार कार्यान्वित, गंभीर हवामान घटनांचा मागोवा घेण्यास ठरणार महत्वाचे)
दरम्यान, धडगाव, अक्कलकुवा, अकराणी, शहादा, शिरपूर, चोपडा, रावेर, यावल ही खान्देशातील काही गावे आणि विदर्भातील जामोद , धामणी , चिखलदरा, वरूडपर्यंत व परिसरातील काही ठिकाणी दाट धुके पसरु शकते. याशिवाय 21 आणि 22 जानेवारीला तुरळक प्रमाणावर गारपीठही होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
देशभराचा विचार करता जानेवारी महिना अर्धा संपताच थंडीचा कडाका काहीसा कमी होतो. मात्र राजधानी दिल्लीसह इतरही काही राज्यांमध्ये थंडीचा कडाका अद्यापही कायम आहे. प्रामुख्याने दिल्लीसह राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये थंडीचा कडाका कायम असून पुढील दोन दिवस या राज्यांमध्ये धुके पाहायला मिळू शकते असे हवामान विभाग म्हणतो.