Maharashtra Vidhan Parishad Elections: कोल्हापूर च्या जागेवर सतेज पाटील यांची बिनविरोध निवड; अमल महाडिक यांनी अर्ज घेतला मागे

त्यामुळे सतेज पाटीलांची विधान परिषदेवर थेट वर्णी लागली आहे.

Satej Patil (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्रात आगामी विधानपरिषद निवडणूकीमध्ये (Maharashtra Vidhan Parishad) कोल्हापूर (Kolhapur)  मधून येणार्‍या जागेवर कॉंग्रेस नेते आणि राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरूद्ध भाजप कडून असलेले उमेदवार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने सतेज पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आहे. अमल महाडिकांसोबतच शौमिका महाडिक यांनी देखील आपला अर्ज मागे घेतला आहे.

अमल महाडिक यांना आपला अर्ज मागे घेण्यासाठी थेट दिल्ली मधून फोन आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माजी खासदार धनंजय महाडिक यांनी काही वेळापूर्वी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे. सध्या चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आहे. त्यांच्या जेपी नड्डा, अमित शाह यांच्यासोबत बैठका झाल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणूकांची चर्चा झाली आणि या बिनविरोध करण्याचा निर्णय झाल्याचं बोललं जात आहे.

महाराष्ट्रात 6 विधानपरिषद जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याबाबत चर्चा सुरू आहे. राज्यात विधानपरिषद निवडणूकांसाठी 10 डिसेंबरला मतदान होणार होते पण आता या जागा बिनविरोधचं केल्या जाण्याची चिन्हं दिसत आहेत. नक्की वाचा: Maharashtra MLC Election 2021: विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर, सतेज पाटील यांच्यासह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला .

विधानपरिषद निवडणूकांची घोषणा होताच कोल्हापूर मध्ये पाटील आणि महाडिक समर्थक कामाला लागले होते. मध्यंतरी महाडिकांकडून सतेज पाटीलांवर काही आरोप देखील करण्यात आले होते मात्र आपण सारी कागदपत्र उमेदवारी अर्जासोबत दिल्याचं सांगत पाटील यांनी आपल्या विजयाबद्दल विश्वस बोलून दाखवला होता. आता कोल्हापूरची देखील निवडणूक बिनविरोध होत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरिश पटेल, गिरीश व्यास, गोपालकिशन बाजोरिया यांचा कार्यकाळ संपत असल्याने रिक्त जागांवर निवडणूका जाहीर  करण्यात आल्या आहेत.