पुणे, नागपूर, जालना आणि नंदूरबार जिल्ह्यात उद्यापासून Covid-19 Vaccine ची ड्राय रन; प्रत्येक जिल्ह्यात 3 लसीकरण केंद्र
कोविड-19 चे संकट अद्याप टळलेले नसल्याने लसीच्या विकासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव नियंत्रणात आला असून तो अधिक वाढू नये म्हणून राज्य सरकारसह सर्वच यंत्रणा प्रयत्नशील आहेत. कोविड-19 (Covid-19) चे संकट अद्याप टळलेले नसल्याने लसीच्या विकासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, लसीच्या प्रतिक्षेत असलेल्या सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. उद्यापासून (2 जानेवारी) पुणे (Pune), नागपूर (Nagpur), जालना (Jalna), नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात लसीच्या ट्राय रन होणार असून प्रत्येक जिल्ह्यासाठी 3 लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. त्या प्रत्येक केंद्रात लसीकरणासाठी 25 लोक असतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे.
यासाठी पुण्यातील जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र मान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील जिजामाता रुग्णालय केंद्र असणार आहे. तर नागपूर मध्ये डागा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कामटी, नागपूर महापालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ट्राय रन होणार आहे. तसंच जालना येथील जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातील शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंदूरबार येथील जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीची ड्राय रन होणार आहे. (जाणून घ्या कसा असेल महाराष्ट्रातील कोरोना विषाणू लसीकरणाचा कार्यक्रम; मतदान प्रक्रियेच्या धर्तीवर लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी)
ANI Tweet:
दरम्यान, गुरुवार. 31 डिसेंबरच्या अपडेटनुसार, राज्यात एकूण 52,902 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत 18,28,546 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 94.64% इतका झाला आहे.