नाशिक जवळील सातपूर MIDC मधील कारखान्याला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल
एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे, त्यानुसार अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
आजचा संपूर्ण दिवस देशवासीयांसाठी अत्यंत सुन्न करणारा होता. सकाळी विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे गॅस गळती अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर छत्तीसगड मधील रायगढ जिल्ह्यात पेपर मिलमधील गॅस गळतीमुळे 7 कामगारांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आता नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सातपूर (Satpur) येथे फार मोठी आग (Fire) लागल्याची माहिती मिळत आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे, त्यानुसार अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. शिवाजीनगर जवळील सातपूर औद्योगिक वसाहतीत ही आग लागली आहे.
एएनआय ट्विट -
मिळालेल्या माहितीनुसार, सातपूर एमआयडीसी (MIDC) मधील गोल्डी कंपनी शेजारील सीआरएन वुडन्स कंपनीत सायंकाळी ही आग लागली. याबाबत माहिती मिळताच सातपूर अग्निशमन दलाचे बंब, बॉश आणि महिंद्र अँड महिंद्रचे बंब आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. कंपनीमध्ये मुख्यत्वे लाकडी समान असल्याने अगदी कमी वेळात आगीने रौद्र रूप धारण केले. सध्या आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत. या आगीत लाखो रुपयांचे किमती वुडन्स जळून खाक झाले आहे. अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही मात्र ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजत आहे. (हेही वाचा: गॅस गळतीमुळे 11 ठार, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदतीची केली घोषणा)
कंपनीच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी अगदी मोजक्या कामगारांसोबत कंपनी सुरु केली होती. या ठिकाणी बॉक्स तयार केले जातात. संध्याकाळी साडेपाच नंतर कामगारांची सुट्टी झाली व त्यानंतर अचानक आग लागली. या आगीत जवळजवळ 90 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.