मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसीय कोकण दौर्यावर; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील विकासकामांचा घेणार आढावा
दरम्यान या कोकण दौर्यामध्ये उद्धव ठाकरे रत्नागिरी मधील नाणार रिफायनरी प्रकल्पासोबतच महत्त्वाच्या विकासप्रकल्पांचा आढावा घेणार आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज (17 फेब्रुवारी) आणि उद्या दोन दिवसांच्या कोकण दौर्यावर आहेत. दरम्यान या कोकण दौर्यामध्ये उद्धव ठाकरे रत्नागिरी मधील नाणार रिफायनरी प्रकल्पासोबतच महत्त्वाच्या विकासप्रकल्पांचा आढावा घेणार आहेत. रायगड,रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यांना ते भेट देणार आहेत. दरम्यान नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला होता. शिवसेनेही त्यांना पाठिंबा देत प्रकल्पाविरोधी भूमिका घेतली होती. मात्र आता पुढील विकासप्रकल्पासाठी आज मुख्यमंत्री स्थानिकांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. आज दुपारी 12च्या सुमारास उद्धव ठाकरे गणपतीपुळे पर्यटन विकासासाठी मंजूर झालेल्या 102 कोटींच्या विकास कामांना मंजुरी मिळालेल्या प्रमुख विकासकामांचे भूमीपूजन करणार आहेत. त्यानंतर आज दक्षिणेतील काशी समजली जाणार्या आंगणेवाडी जत्रेला नेते आणि पदाधिकार्यांसोबत जाऊन भराडी देवीचं दर्शन घेणार आहे. दुपारी 2.30 ते 3 च्या दरम्यान ते दर्शनाला पोहचतील.
उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौर्याच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी मात्र टीकास्त्र डागलं आहे. उद्धव ठाकरे यांचा हा दौरा पर्यटन दौरा असल्याचं म्हणत त्यांनी खिल्ली उडवली आहे. या दौर्यादरम्यान कोकणवासीयांना काहीच मिळणार नसल्याचं भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले आहेत. अद्याप अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे तुमचं सरकार तुम्ही चालवा; कोकणी जनतेला शांतपणे जगू द्या असेही त्यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग किल्ल्याची हवाई पाहणी करणार आहेत तर प्रस्तावित चिपी विमानतळाचे काम देखील पाहणार आहेत. त्यानंतर विमानतळाबाबत आढावा बैठक होईल. दरम्यान मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. त्यासोबतच नाणार रिफायरी प्रकल्पाविरोधात स्थानिक आक्रमक आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये नाणार प्रकल्पाची माहिती देणारी जाहिरात देण्यात आल्याने या प्रकल्पावरून शिवसेनेने आपली भूमिका बदलली का? असा संशय स्थानिकांच्या मनात निर्माण झाला आहे.