Loksabha Election 2024: कल्याणमध्ये गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
यामुळे खासदार शिंदे यांच्यापुढील अडचण काहीशी कमी झाल्याचे चित्र आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिकरित्या माध्यमांशी बोलताना त्यांच्या नावाची घोषणा केली. कल्याण लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार लढणार हा प्रश्न ऐरणीवर होता. यानंतर भाजपचे नेते गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदेंसाठी आपण काम करणार नाही, असा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडं पाठवला होता. यांनतर आज रविंद्र चव्हाण यांनी गणपत गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली. यानंतर त्यांनी आपला पाठिंबा हा श्रीकांत शिंदे यांना दर्शवला आहे. (हेही वाचा - Shrikant Shinde on Ganpat Gaikwad: गुंड प्रवृत्तीचे लोक असं वागत असतील तर ते योग्य नाही..., श्रीकांत शिंदेंचा गणपत गायकवाडांवर हल्लाबोल)
भाजप आमदार गणपत गायकवाड समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात भाजप मधील वरिष्ठांना यश आले आहे. यामुळे खासदार शिंदे यांच्यापुढील अडचण काहीशी कमी झाल्याचे चित्र आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप व शिवसेना शिंदे गटात धुसफूस सुरू असून त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीवर उमटत आहेत. हा वाद इतका टोकाला गेला आहे की शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे असतील तर त्यांना सहकार्य न करण्याची भूमिका कल्याण पूर्वेतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी घेतली.
भाजप कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा केली तरी कार्यकर्त्यांना समज देण्याची मागणी शिवसेना गोटातून होत होती. आज सकाळीच मंत्री चव्हाण यांच्या बंगल्यावर कल्याण पूर्वेतील भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत मंत्री चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढल्याचे बोलले जात आहे.