Leopard Safari: मुंबईकरांसाठी खुशखबर! बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुरु होणार बिबट्याची सफारी
या राष्ट्रीय उद्यानाला वर्षभरात 20 लाख पर्यटक भेट देतात. जर बिबट्याची सफारी उपलब्ध झाली तर पर्यटकांची संख्या वाढेल व त्यातून वनक्षेत्राचे उत्पन्न वाढेल, अशी माहिती देऊन मुख्य वनरक्षक श्रीजी मल्लिकार्जुन यांनी शेलार यांच्यासमोर सादरीकरण केले.
मुंबईमधील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (Sanjay Gandhi National Park) बिबट्याची सफारी (Leopard Safari) सुरु होणार असून, आज माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी याबाबत घोषणा केली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सध्या वाघ आणि सिंहाच्या दोन सफारी उपलब्ध आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात बिबट्यांचे सापडलेले बछडे याच उद्यानात संरक्षित करण्यात आले असून, त्यांचे पालन करण्यात येत आहे. मात्र, पर्यटकांना पाहण्यासाठी त्यांची सफारी उपलब्ध नाही. त्यासाठी सुमारे 30 हेक्टर जागा लागणार असून ही जागा या क्षेत्रात उपलब्ध आहे. तर सफारीसाठी प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे 5 कोटी खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या राष्ट्रीय उद्यानाला वर्षभरात 20 लाख पर्यटक भेट देतात. जर बिबट्याची सफारी उपलब्ध झाली तर पर्यटकांची संख्या वाढेल व त्यातून वनक्षेत्राचे उत्पन्न वाढेल, अशी माहिती देऊन मुख्य वनरक्षक श्रीजी मल्लिकार्जुन यांनी शेलार यांच्यासमोर सादरीकरण केले. याबाबत आढावा घेतल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांनी या क्षेत्रात नवी बिबट्याची सफारी सुरू करा, त्यासाठी लागणारा निधी वन खाते आणि जिल्हा नियोजन समितीमधून आम्ही देऊ, असे त्यांनी सांगितले. याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
या उद्यानात ‘भारत आणि भारती’ हे तीन वर्षाचे दोन सिंह नुकतेच 26 जानेवारीला गुजरातमधून आणण्यात आले आहेत. त्यांना वर्षभरासाठी मंत्री शेलार यांनी दत्तक घेतले असून, त्यांच्या पालनपोषणासाठी होणारा खर्च मंत्री शेलार वैयक्तिकरित्या करणार आहेत. दुसरीकडे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 400 वन मजूर असून ते उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता तसेच वन्य प्राण्यांचा अधिवास असलेल्या क्षेत्रात स्वतःचा जीव धोक्यात घालून सतत गस्तीचे काम करतात. यातील बहुसंख्य हे आदिवासी बांधव आहेत. (हेही वाचा: Electric Water Taxi in Mumbai: भारतातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी मुंबईत; पुढच्या महिन्यापासून सेवेस प्रारंभ)
मानवी वस्तीमध्ये वन्य प्राणी घुसल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी जाणारी 11 जणांची टीम असून, या सगळ्यांचा प्राण्यांशी थेट संपर्क येतो. मात्र या सगळ्यांचा सुरक्षा विमा उतरवण्यात आलेला नाही, ही बाब मंत्री शेलार यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने याबाबत निर्देश दिले व या सगळ्यांचा सुरक्षा विमा उतरवण्यास सांगितले. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही ही त्यांनी दिली.
(The above story first appeared on LatestLY on Jan 31, 2025 10:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

