जळगाव: सलमान खान याच्याशी लग्न करण्यासाठी शिक्षिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पोलिसांना 12 पानी पत्र

जळगाव येथे राहणाऱ्या एका 35 वर्षीय शिक्षिकेने दबंगस्टार सलमान खान सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Salman Khan (Photo Credit: Instagram)

बॉलिवूड स्टार्सची क्रेझ सर्वांनाच असते. त्यांच्यावर अनेकांचे क्रशही असते. आपला जोडीदार आपल्या आवडत्या कलाकारासारखा असावा, अशी सुप्त इच्छाही अनेक तरुण-तरुणींच्या मनात असते. मात्र हे वेड इतके वाढावे की चक्क त्या सेलिब्रेटीशी लग्न करण्याचा हट्ट एखादीने धरावा. तो हट्ट साधासुधा नाही तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पोलिसांना पत्र लिहावे.

कदाचित या सगळ्यावर तुमचा विश्वास बसत नसेल. पण लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, जळगाव येथे राहणाऱ्या एका 35 वर्षीय शिक्षिकेने दबंगस्टार सलमान खान सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सलमानच्या प्रेमात अखंड बुडालेल्या या शिक्षिकेने पंतप्रधान आणि पोलिसांना चक्क 12 पानी पत्र लिहिले आहे.

ही महिला जळगाव मधील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहते. पंतप्रधान आणि पोलिसांना लिहिलेल्या पत्रात तिने म्हटले आहे की, "मला आई-वडील नाहीत. मला जीवनसाथी हवा आहे, पण तो सलमान खानच हवा. मला त्याच्याशीच संसार करायचा आहे. आपले लग्न व्हावे, संसार व्हावा, जोडीदार असावा, अशी माझी इच्छा आहे. सलमान खानची तशीच इच्छा आहे. त्यामुळे मला त्याच्याशीच लग्न करायचे आहे." याशिवाय या पत्रात तिने संसार, राजकारण आणि समाजकारण यावर भाष्य केले आहे.

12 डिसेंबर 2018 मध्ये तिने पोलीस अधीक्षक यांच्यासह अनेक ठिकाणी अर्ज व पत्रे दिली होती. चौकशीनंतर ही सर्व अर्ज आणि पत्र एमआयडीसी पोलीस स्टेशनला आणण्यात आली. गुरुवारी हे सर्व अर्ज पोलिसांनी निकाली काढले. मात्र महिलेच्या या बालिश हट्टापुढे पोलिसांनीही हात टेकले आहे.