Ganeshotsav 2024: गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात 10 दिवस दारूबंदीचा प्रस्ताव; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे शहराचे लक्ष
दारूबंदी कायदा, 1949 अन्वये हा निर्णय घेण्यात आला.
पुण्यात (Pune) 2023 मध्ये गणेशोत्सवादरम्यान (Ganeshotsav 2024) 3 दिवसांच्या दारूबंदीची अंमलबजावणी करण्यात आली होती. आता यंदा पुणे पोलीस या वर्षीच्या उत्सवासाठी 10 दिवसांच्या दारूबंदीचा विचार करत आहेत. शहरात गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू असताना, काही गणेश मंडळांनी मांडलेल्या या 10 दिवस दारूबंदीच्या प्रस्तावाची पुण्यात चर्चा रंगली आहे. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात नुकतीच एक बैठाक पार पडली. या बैठकीत 300 हून अधिक गणेश मंडळांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. यावेळी काही सदस्यांनी संपूर्ण 10 दिवसांच्या उत्सव कालावधीत दारूबंदीची सूचना केली.
पुणे जिल्ह्यातील गणेश चतुर्थी, 28 सप्टेंबर आणि विसर्जनाच्या दिवशी दारूची दुकाने बंद राहिली. विसर्जनाच्या 5व्या आणि 7व्या दिवशी संबंधित भागात विसर्जन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दारू दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
आता विशेषत: मंडळांनी 10 दिवसांच्या दारूबंदीची विनंती केल्यानंतर, जिल्हाधिकारी कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक ढोल विरुद्ध डीजे यांचा वापर, यासह विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. पुढील बैठकीत मिरवणुकीत परवानगी असलेल्या ढोल पथकांच्या संख्येसह इतर बाबींवर अंतिम निर्णय होणे अपेक्षित आहे. (हेही वाचा: Ganeshotsav 2024: जाणून घ्या कसा साजरा कराल पर्यावरणपूरक गणेशोत्सव; राज्य शासनाने जारी केल्या उपयुक्त टिप्स)
दरम्यान, लेझर बीममुळे अर्धवट अंधत्व आणि डोळ्यांना दुखापत झाल्याच्या अहवालानंतर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये लेझर बीमच्या वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. सणाच्या मिरवणुकांमध्ये अनेकदा ड्रम बीट्ससह लेझर लाइट्सचा वापर हा एक लोकप्रिय ट्रेंड बनला आहे. मात्र, यामुळे डोळ्यांना एक महत्त्वपूर्ण धोका निर्माण होतो, त्यामुळे पुण्यात गणेशोत्सव मिरवणुकीच्यावेळी लेझर बीमच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.