Ganeshotsav 2020: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खेतवाडी गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या सेलिब्रेशन संदर्भात घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

दक्षिण मुंबईतील अखिल खेतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे (Khetwadi Sarvajanik Ganeshotsav Mandal) यंदा सरकार नियमांचे पालन करून अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहे.

Image For Representation (Photo Credits-Facebook)

यंदाच्या गणेशोत्सवावर (Ganeshotsav 2020) कोरोना व्हायरसचे (Coronavirus) भीषण संकट असताना मुंबईतील महत्वाच्या आणि मोठ्या आणखीन एका गणेशोत्सव मंडळाने याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दक्षिण मुंबईतील अखिल खेतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे (Khetwadi Sarvajanik Ganeshotsav Mandal) यंदा सरकार नियमांचे पालन करून अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहे. यानुसार खेतवाडी मधील वेगवेगळ्या गल्लीत स्थापन होणाऱ्या मोठाल्या गणेशमूर्ती यंदा पाहायला मिळणार नाहीत. याऐवजी प्रत्येक मंडळातर्फे केवळ दोन ते 5  फुटाची गणेशमूर्ती आणून परंपरेनुसार सेलिब्रेशन केले जाणार आहे. दरवर्षी लालबाग नंतर सर्वात जास्त गर्दी ही खेतवाडी मध्ये पाहायला मिळते, साधारण 75 हजार भाविक विसर्जन- आगमन मिरवणुकीत सहभागी होतात मात्र यंदा ही गर्दी अनेकांच्या जीवास धोका ठरू शकते याचे भान ठेवून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

वास्तविक काही दिवसांपूर्वी मुंबईतील मानाचा असा वडाळा जीएसबी मंडळाचा गणेशोत्सव यंदासाठी रद्द करण्यात आल्याची घोषणा मंडळाच्या वतीने करण्यात आली होती, त्यांनतर काहीच दिवसात खेतवाडीतील गणेशोत्सव सुद्धा यंदा भाद्रपदाच्या याऐवजी माघ महिन्यात साजरा होईल असे सांगणारे वृत्त माध्यमात दिसत होते. मात्र यावर आता स्वतः मंडळानेच स्पष्टीकरण देऊन यंदा भाद्रपद गणेश चतुर्थी म्हणजेच 22 ऑगस्ट रोजीच गणेशोत्सव साजरा होईल मात्र त्याचे स्वरूप हे दरवर्षीपेक्षा साधे असेल अशी घोषणा केली आहे.

दरम्यान, मुंबईतील गणेशोत्सव हा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हजारो- लाखो भाविक या निमित्ताने मुंबापुरीत येतात. यंदा अशी गर्दी करणे हे सर्वांसाठीच धोक्याचे ठरू शकते असे सांगत काही दिवसांपूर्वी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने सुद्धा सर्व गणेशमंडळांना यंदा उत्सव साधेपणाने साजरा करावा असे सूचित केले होते. यावर अद्याप अनेक मोठ्या मंडळांचा निर्णय होणे शिल्लक आहे.