Ganesh Visarjan 2020 Guidelines: कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनासाठी BMC कडून नवी नियमावली जारी
त्यामुळे गणपती विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेकडून विशेष नियमावली जारी करण्यात आली होती.
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) सावटामुळे यंदाचा गणेशोत्सवाला (Ganeshotsav) अत्यंत साधे स्वरुप प्राप्त झाले आहे. कोविड-19 (Covid-19) चा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टसिंग पाळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच मुंबई महानगरपालिकेकडून (Brihanmumbai Municipal Corporation) विशेष नियमावली जारी करण्यात आली होती. आता गणेश विसर्जनासाठी खास नियम लागू करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत. दरम्यान यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे. (कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी ऑनलाईन गणपती विसर्जन करण्याची सोय; ठाणे महानगरपालिकाचे महत्त्वपूर्ण निर्णय)
BMC Tweet:
# घरगुती गणेश मुर्तींचे विसर्जन घराच्या घरी करण्यावर अधिक प्राधान्य द्यावे. घरगुती गणेश मुर्त्यांचे विसर्जन घरातच बादलीत किंवा ड्रममध्ये करावे.
# आपल्या घरापासून 2 किमीच्या अंतरावर असलेल्या विसर्जन घाटावरच गणेशमुर्तीचे विसर्जन करावे. गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यासाठी समुद्रात किंवा पाण्यात उतरण्यास भाविकांना परवानगी देण्यात लेली नाही.
# नैसर्गिक विसर्जन स्थळांवर महापालिकेद्वारे मुर्ती संकलनाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
# गणपती विसर्जनासाठी महापालिकेच्या 24 विभागांमध्ये सुमारे 170 कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे कृत्रिम तलाव लगत राहणाऱ्या भाविकांना नैसर्गिक विसर्जन स्थळांवर जाण्यास मनाई आहे. त्यामुळे विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर करणे बंधनकारक असणार आहे.
# गणेशमुर्ती संकलन केंद्र आणि कृत्रिम तलावांची माहिती, पत्ता, गुगल लोकेशन्स महापालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेत स्थळावर whats new section मध्ये उपलब्ध आहे.
# कन्टेंटमेंट झोनमध्ये असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मुर्तींचे विसर्जन मंडपातच करणे आवश्यक आहे किंवा विसर्जन पुढे ढकलावे. कोविड-19 संकटामुळे सिल्ड झालेल्या इमारतींमधील गणेशमुर्तींच्या विसर्जनाची घरीच व्यवस्था करावी.
# गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी करण्यात येणारी पूजा, आरती घरीच किंवा मंडपातच करुन घेणे बंधनकारक असणार आहे. नैसर्गिक, कृत्रिम विसर्जन स्थळांवर किंवा मुर्ती संकलन केंद्रांवर आरती करण्यास परवानगी नाही.
# भाविकांनी कृपया फिरत्या विसर्जन स्थळांचा (mobile spots on wheels) लाभ घ्यावा, असे आवाहनही पालिकेकडून करण्यात आले आहे. फिरती विसर्जन स्थळे ट्रकवर टाक्या किंवा इतर व्यवस्था करुन तयार करण्यात आली आहेत.
# तसंच यंदा विसर्जन मिरवणूकीसाठी परवानगी नाही.
# विसर्जनादरम्यान सोशल डिस्टसिंगचे पालन करणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे बंधनकारक असणार आहे.
कोविड-19 चा धोका टाळण्यासाठी पालिकेने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्यासह इतरांचीही सुरक्षितता राखली जाईल. दरम्यान गणेशोत्सवाच्या उत्साहाच्या भरात नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.