Andheri Fire: अंधेरी येथील कामगार हॉस्पिटलला लागलेल्या भीषण आगीत 6 जणांचा मृत्यू, 147 जण जखमी

अंधेरीतील कामगार रुग्णालयाला आग लागली असून रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

कामगार हॉस्पिटल आग (Photo Credit : ANI)

अंधेरीतील कामगार रुग्णालयाला (Kamgar Hospital) लागलेल्या भीषण आगीत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 147 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी कुपर रुग्णालयात नेण्यात आलं आहे. दुपारी 4:30 च्या सुमारास रुग्णालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली आहे. आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले असून या आगीत काहीजण अडकल्याची भीतीही वर्तवली जात आहे. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे.

आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र काही लोकांनी भीतीने हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावरुन उड्याही मारल्या. रूग्णालयातल्या रूग्णांना आणि इतर लोकांना बाहेर काढण्याचे कामही सुरु असताना बघ्यांनी आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या बाहेर एकच गर्दी केली. ऑपरेशन थिएटरजवळही आग लागली असून बचावकार्य सातत्याने सुरु आहे.