Human Finger Found In Ice Cream: मालाड घटनेत आईस्क्रीममध्ये सापडलेलं बोट कंपनीच्या कर्मचाऱ्याचं? धक्कादायक माहिती आली समोर

त्याच दिवशी कंपनीमध्ये एका कर्मचाऱ्याच्या बोटाला इजा झाली होती, असे मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

Photo Credit - X

Human Finger Found In Ice Cream: मालाड येथील घटनेत युम्मो आईस्क्रीम(Yummo Ice Cream)मध्ये आढळलेले बोट हे पुण्यातील युम्मो आईस्क्रीम कंपनीच्या कर्मचाऱ्याचे असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 26 वर्षीय डॉक्टरला ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा(Finger in Ice Cream) सापडला सापडला होता. ही घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणी कंपनीतील अज्ञात कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता तपासात या घटनेत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासात लक्षात आले की, पुण्यातील युम्मो आईस्क्रीमच्या कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या बोटाला दुखापत झाली होती. त्याचेच बोट कदाचित आईस्क्रीममध्ये आले असावे, असा पोलिसांचा संशय आहे.

आईस्क्रीममध्ये सापडलेल्या बोटाचे नमुने पोलिसांनी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच हे बोट त्याच कर्मचाऱ्याचे आहे का? याचा तपास लागू शकेल.

मालाडमधील प्रकरणात डॉ. ब्रँडन फेर्रावने यांनी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईस्क्रीममध्ये त्यांच्या बहिणीला मांसाचा तुकडा सापडला. सुरुवातीला हा सुक्यामेव्याचा भाग असावा, अशा संशय डॉ. ब्रँडन फेर्रावने यांच्या बहिणीला आला. मात्र स्वतः ब्रँडन यांनी या तुकड्याची पाहणी केल्यानंतर त्यांना हा माणसाच्या बोटाचा भाग असल्याचे लक्षात आले. त्यानंतर डॉ. ब्रँडन यांनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढून ठेवले होते. यावरून पोलिसांनी युम्मोच्या कर्मचाऱ्यांविरोधात भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम २७२ (खाद्यपदार्थात भेसळ करणे), २७३ (हानीकारक बनलेले खाद्यपदार्थ किंवा पेय विकणे) आणि ३३६ (मानवी जीव धोक्यात घालणारे कृत्य) अन्वये गुन्हा दाखल केला.

युम्मो आईस्क्रीमचे उत्पादन पुण्यातील इंदापूर येथे असलेल्या फॉर्च्यून डेअरीमध्ये करण्यात येते. या प्रकारानंतर भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण (FSSAI) संस्थेने फॉर्च्यून डेअरीचा परवाना रद्द केला आणि युम्मो आईस्क्रीमच्या वितरणावर बंदी आणली.