Death Threat to Bachchu Kadu: 'जीवाला धोका, प्रकृतीच्या चौकशीबाबत फोन', आमदार बच्चू कडू यांचे पोलीस अधीक्षकांना पत्र
सातत्याने आपल्या प्रकृतीची चौकशी केली जात आहे. समोरील व्यक्ती 'भाऊ तुमचा अपघात झाला आहे का? तुमची तब्येत कशी आहे', असे विचारत आहे. सदर व्यक्तीस आपण जाब विचारला असता तो व्यक्ती धमकी देत आहे.
अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या जीविताला धोका असल्याचे पुढे आले आहे. स्वत: बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनीच जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. आपला कोणताही अपघात झाला नसताना तशा अफवा पसरवल्या जातात, सातत्याने अनोळखी फोनवरुन फोन येतात आणि समोरील व्यक्तीकडून आपल्या प्रकृतीची चौकशी कारणाशिवाय केली जाते, असे सांगत या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जावी, अशी मागणी आमदार कडून यांनी पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, या पत्रामुळे राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.
भाऊ तुमचा अपघात झाला आहे का?
आमदार बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आपणास अनोळखी फोन क्रमांकावरुन फोन येत आहेत. सातत्याने आपल्या प्रकृतीची चौकशी केली जात आहे. समोरील व्यक्ती 'भाऊ तुमचा अपघात झाला आहे का? तुमची तब्येत कशी आहे', असे विचारत आहे. सदर व्यक्तीस आपण जाब विचारला असता तो व्यक्ती धमकी देत आहे. एबीपी माझा या खासगी वृत्तवाहिणीने दिलेल्या वृत्तानुसार, बच्चू कडू यांना अज्ञात व्यक्तीने फोनवरुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्याने म्ह्टले की, मी शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. मी गडचिरोली येथील राहणारा असून माझे आणि नक्षलवाद्यांचे अतिशय नजिकचे संबंध आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी जसे दिघे यांना संपविले तसेच जर एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना संपविले नाही तर मी स्वत: त्यांना संपवणार. बच्चू कडू म्हणचे काहीच नव्हे. मी त्याला संपवणारच.."आज मौका देख के, बच्चू कडू को चौका मारेंगे", अशा पद्धतीची धमकी कडू यांना आल्याचा उल्लेख पत्रा मध्ये आहे. (हेही वाचा, DCM Devendra Fadnavis Receives Death Threat: सोशल मीडियाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकी, गुन्हा दाखल)
बच्चू कडू यांना आगोदरच वाय प्लस सुरक्षा
दरम्यान, बच्चू कडू यांना वाय प्लस सुरक्षा आगोदरच प्रदान करण्यात आली आहे. असे असतानाही त्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने त्यांचा आचलपूर मतदारसंघ आणि संपूर्ण अमरावती जिल्ह्यातच खळबळ उडाली आहे. बच्चू कडू यांच्यासोबत काही घातपात तर करण्याचा कोणाचा प्रयत्न अथवा विचार नाही ना? अशी चर्चाही ग्रामिण भागामध्ये पाहायला मिळते आहे. बच्चू कडू हे प्रहार संघटनेचे नेते आहेत. आपल्या सरळोट विधानांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. खास करुन ते दिव्यांग आणि अपंगांसाठी विशेष काम करतात, असे सांगितले जाते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते मंत्रीही राहिले आहेत. सध्या ते महायुतीसोबत आहेत.