कोलगेट-सेन्सोडाईन ट्युथपेस्ट कंपन्यांकडून ग्राहकांची दिशाभूल; FDA ने जप्त केला साडेचार कोटींचा साठा

या प्रकरणी अन्न आणि औषधं प्रशासनाने या कंपन्यांना चांगलाच दणका दिला आहे.

Toothpaste (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

प्रोडक्ट्सच्या जाहीराती आपल्याला प्रोडक्टकडे आकर्षित करतात किंवा त्याची भूरळ पाडतात, असे म्हटले तरी वावगे ठरु नये. मात्र काही कंपन्या चुकीच्या जाहिराती करुन ग्राहकांची फसवणूक करत आहेत. अशाच प्रकारे चुकीच्या जाहिरातींद्वारे कोलगेट (Colgate), सेन्सोडाईन (Sensodyne) ट्युथपेस्टने ग्राहकांची दिशाभूल केली आहे. या प्रकरणी अन्न आणि औषधं प्रशासनाने (Food and Drug Administration) या कंपन्यांना चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे टुथपेस्टच्या निर्मात्या कंपन्या मे. कोलगेट पामोलिव्ह इंडिया लि. आणि मे. ग्लॅक्सो स्मिथलाईन कंझ्युमर हेल्थ लिं. यांच्यावर एफडीएकडून कारवाई करण्यात येणार आहे.

या ट्युथपेस्टच्या जाहिरातींमध्ये हे प्रोडक्ट्स डॉक्टर्स रेकमेंडेट, क्लिनीकली प्रुव्हन, मेडिकली टेस्टेड आणि दातांच्या सुरक्षेसाठी उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या जाहिराती खोट्या आणि चुकीच्या असून याद्वारे ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप एफडीएने केला आहे. कोलगेट आणि सेन्सोडाईन टुथपेस्टला 'कॉस्मेटिक' म्हणून परवाना देण्यात आला आहे. मात्र औषधे आणि सौंदर्यप्रसाधन कायद्यानुसार, कोलगेट, सेन्सोडाईन टुथपेस्टच्या लेबलवरुन माहिती ही ग्राहकांची दिशाभूल करणारी आहे.

या प्रकरणी ठाण्यातून कोलगेट, सेन्सोडाईनचा 4 कोटी 69 लाख रुपयांचा साठा अन्न आणि औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे.