महाराष्ट्रात CAA लागू करण्यावर खासदार संजय राऊत यांनी सोडलं मौन; केलं हे मोठं वक्तव्य!
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना नागरिकत्त्व सुधारणा कायदा लागू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतील असं म्हटलं आहे.
सध्या मागील काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात तणावाची परिस्थिती आहे. संसदेमध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर तातडीने त्याचे कायद्यामध्ये रूपांतर करण्यात आले. या निर्णयाला समाजात संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरीही ईशान्य भारत पेटला आहे. केरळ, पंजाब, पश्चिम बंगालने या कायद्याला त्यांच्या राज्यामध्ये लागू करण्यास नकार कळवला आहे. आता महाराष्ट्र यावर काय भूमिका घेणार? याची उत्सुकता आहे. दरम्यान यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना नागरिकत्त्व सुधारणा कायदा लागू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतील असं म्हटलं आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये कॉंग्रेस, शिवसेना, एनसीपीचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. कॉंग्रेसने देशभरात ज्या राज्यात त्यांची सत्ता आहे तेथे हा कायदा लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर शिवसेने राज्यसभेत नागरिकत्त्व सुधारणा कायदा मंजूर करताना सभागृह त्याग करून आपला निषेध नोंदवला होता. मात्र आता राज्यात महाविकास आघाडी सरकार एकत्र काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. CAA Protest: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'शांततेच्या आवाहना'च्या ट्वीटवर अभिनेत्री रेणूका शहाणे कडून टीका; 'तुमची IT सेल खरी तुकडे तुकडे गँग' असल्याचं ट्वीट.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल सार्या गोष्टी नीट समजून घेऊन नंतरच तो राज्यात लागू करायचा का? यावर निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान भाजपा आणि शिवसेना ही महायुती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र होती. आता राज्यात युतीचं सरकार नाही त्यामुळे शिवसेना सत्तेत बसल्यावर काय निर्णय घेणार हे पहाणंदेखील उत्सुकतेचं ठरणार आहे.