कोविड-19 रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची बैठक; लसीकरणासंदर्भात दिले 'हे' निर्देश
येत्या 3-4 महिन्यात प्राधान्य गटातील सर्वांना लसीचे दोन डोस देण्यायचे आहेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
राज्यातील कोविड-19 (Covid-19) रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज विभागीय आयुक्तांबरोबर महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कोविड-19 लसीकरणासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. येत्या 3-4 महिन्यात प्राधान्य गटातील सर्वांना लसीचे दोन डोस देण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या सूचनाही केल्या. या बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील 134 खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी केंद्राची मान्यता मिळाली असून रोज 3 लाख लसी दिल्या गेल्या पाहिजेत यादृष्टीने नियोजन करण्याचेही आदेश त्यांनी आरोग्य विभागाला दिले. तसंच उन्हाळ्यामुळे लसीकरण केंद्रांवर योग्य सुविधा पुरवण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले. लसीकरणासाठी भर उन्हात रांगेत अभे असलेल्या ज्येष्ठ किंवा व्याधी असलेल्या रुग्णांची गैरसोय होणार नाही. तसंच वादविवाद होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विशेष म्हणजे उन्हाळ्यात दुपारच्या आत किंवा दुपारनंतर व उशिरा रात्री पर्यंत लस देण्याची व्यवस्था करावी, अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
CMO Maharashtra Tweet:
काही महिन्यांतच पावसाळा सुरु होईल याच पार्श्वभूमीवर कोविड रुग्णांसाठी उभारलेल्या फिल्ड रुग्णालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक ती देखभाल व दुरुस्ती करून घेण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले आहेत. तज्ञांनी कोविड-19 च्या बदलत्या लक्षणांची नोंद घेऊन आवश्यक त्या उपचार पद्धतीविषयी डॉक्टरांना मार्गदर्शन करावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
दरम्यान, आज मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची उच्चांकी वाढ झाली. मागील काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शहरं, जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी देखील पावले उचलण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.