Chhatrapati Sambhaji Nagar Crime: संभाजीनगरमध्ये व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर 6 जणांचा अत्याचार
या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात एकूण सहा जणांविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक तसेच आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरात एका 15 वर्षांच्या मुलीचा अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करत तिच्यावर 6 जणांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा सर्व प्रकार सुरु होता. तर या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात एकूण सहा जणांविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक तसेच आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अक्षय चव्हाण असे मुख्य आरोपीचे नाव आहे.
पीडित अल्पवयीन मुलीवर सुरुवातीला ओळखीच्या अक्षय चव्हाण नावाच्या मित्राने अत्याचार केला. अत्याचार करतानाचा व्हिडीओ देखील बनवला. पुढे पीडित मुलीला तोच व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल केलं. धक्कादायक म्हणजे त्याच्या अन्य सहा ते सात मित्रांना या पाशवी कृत्यात सहभागी केले. दरम्यान सततच्या या अत्याचाराला कंटाळून मुलीने पळून जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी ती रेल्वे स्थानकावर सुद्धा पोहोचली. पण तिला एकटे पाहून, तिच्या हालचालीवरुन पोलिसांना संशय आला आणि हा सर्व प्रकार समोर आला.
सदर मुलीने 18 मे रोजी तिने घरातील वीस हजार रोख, सोन्याचे दागिने, वडिलांचा मोबाईल फोन घेऊन पोबारा केला. रात्री बारा वाजता एकटी रेल्वे स्थानकावर मित्राची वाट पाहत उभी होती. मित्र मात्र आलाच नाही. स्थानकावरील एका पाणी विक्रेत्याला हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने रेल्वे पोलिसांना कळवले. रेल्वे पोलिसांनी शहर पोलिसांना कळवले. दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक अनिता फसाटे यांनी पथकासह धाव घेत तिला ताब्यात घेतले. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.