Buldhana Flash Flood Risk: बुलढाणा जिल्ह्यातील रोटी गावाला पुराचा वेढा; नांदुरा तालुक्याशी संपर्क तुटला

पूर्णा आणि ज्ञानगंगा नदीच्या पुराच्या पाण्याने बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील रोटी गावाला वेढा दिला असून गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. प्रशासनाकडून ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात पूर्णा आणि ज्ञानगंगा नद्यांना आलेल्या पुरामुळे रोटी गावाला चोहोबाजूंनी पाण्याचा वेढा पडला आहे. यामुळे या गावाचा तालुक्याशी संपूर्ण संपर्क तुटला असून, प्रशासनाकडून ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

रोटी गावाचा संपर्क तुटला

पूर्णा आणि ज्ञानगंगा या दोन नद्यांच्या मधोमध वसलेल्या रोटी गावाला जोडणाऱ्या ज्ञानगंगा नदीवरील एकमेव पुलावरून पुराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे गावाचा बाहेरील जगाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. आजारी रुग्णांना उपचारासाठी शहरात आणणेही सध्या अशक्य झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

इतर गावांनाही पुराचा फटका

रोटी गावाशिवाय हिंगणा इसापूर, हिंगणा दादगाव यांसह तालुक्यातील अन्य काही गावांमध्येही पुराचे पाणी शिरले आहे. पिंपळखुटा धांडे गाव जलमय झाले असून अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याचे वृत्त आहे. रोटी गावाकडे जाणारा पूल पाण्याखाली गेल्याने तसेच इसापूर आणि आंबोळा परिसरातील मार्गही पाण्यामुळे बंद झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

खामगाव शहरात अवघ्या काही तासांत मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाल्याने सखल भागांत पाणी साचले असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

घरांची पडझड, नुकसान

पुराच्या पाण्यामुळे अनेक घरांची पडझड झाली असून, अन्नधान्य आणि गुरांच्या चाऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचीही हानी झाली आहे. यामुळे अनेक नागरिकांना घरे सोडून पुनर्वसित गावठाणात आश्रय घ्यावा लागला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील रोटी गावाला पुराचा वेढा

प्रशासनाचे प्रयत्न सुरू

पूरस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडून बाधित गावांतील ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नादुरा तालुक्यासह जिल्ह्यातील खामगाव, मलकापूर आणि बुलढाणा तालुक्यातही मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, पुलांवरून पाणी वाहत असल्याने काही मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पातील जलसाठाही वाढत असून येळगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement